किनवट शहरातून जाणार्‍या महामार्गाचा तिढा सुटण्याच्या आशा पल्लवित ; पैनगंगा अभयारण्य संनियत्रण समितीचे रस्ता रुंदीसाठी ना हरकतीचे पत्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 October 2022

किनवट शहरातून जाणार्‍या महामार्गाचा तिढा सुटण्याच्या आशा पल्लवित ; पैनगंगा अभयारण्य संनियत्रण समितीचे रस्ता रुंदीसाठी ना हरकतीचे पत्र

किनवट, दि.23 (प्रतिनिधी) :   तालुक्यातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (ए) चा प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने माजी आमदार प्रदीप नाईकांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, वन विभागाच्या पैनगंगा अभयारण्य सनियंत्रण समितीने किनवट शहर व परिसरातून 30 मिटर रुंदीचा रस्ता बनविण्यास समितीची काहीच हरकत नसल्याचे पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी नुकतेच रुजु झालेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात पुढील कारवाई करण्याची विनंती केली आहे. या वेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना चर्चेसाठी बोलाविल्या गेले होते, मात्र ते बैठकीला गैरहजर होते अशी माहिती सूत्रांनी दिली.


     मा.आ.प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकार्‍यांना हा मार्ग किनवट माहूर विधानसभा क्षेत्राकरिता किती महत्वाचा आहे हे निदर्शनास आणून दिले. सोबतच मार्गाची रुंदी कमी झाली तर गोकुंदा येथे प्रस्तावित रेल्वे उड्डानपूल होऊ शकणार नाही. त्यामुळे वाहतुक खोळंबण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी महामार्गासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागील दोन वर्षापासून करत असलेल्या पाठपुराव्याला अंतिम स्वरुप लवकरच येणार असल्याचे कळते.


       या संदर्भात पैनगंगा अभयारण्य सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा यवतमाळचे जिल्हाधिकारी, वनसंरक्षक पुसद, माजी आमदार प्रदीप नाईक, किनवट येथिल लोकप्रतिनिधी व पत्रकारांच्या उपस्थितीत  13 जून 2022 रोजीची सुनावनी झाल्यानंतर वन विभागाच्या पैनगंगा अभयारण्य सनियंत्रण समितीने किनवट शहर व परिसरातून 30 मिटर रुंद रस्ता बनवण्यात समितीची काहीच हरकत नसल्याचे पत्र दिल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात नांदेड जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर किनवट शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या कामावरील कंत्राटदाराचे काम हे 70 टक्क्यापेक्षा जास्त झालेले आहे, अशा स्थितीत जर संबधित कंत्राटदाराने या कामावरुन आपला गाशा गुंडाळला तर हे काम पुढील अनेक वर्षे प्रलंबित राहणार आहे. विशेष म्हणजे कोणताही कंत्राटदार जर त्यांच्या कामाचा 70 टक्क्यापेक्षा जास्त भाग पूर्ण करतो, तेव्हा त्यांची सुरक्षा अनामत रक्कम व संबधित सिक्युरिटी त्यांना परत मिळतात,असे माजी आमदार नाईक यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. मागील 6 वर्षापासून हे काम प्रलंबित आहे. या मार्गावर कोणत्याही प्रकारचे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले नियम पाळण्यात न आल्याने अनेक युवकांना, वयस्कांना रात्री-बेरात्री या मार्गावरील प्रवासात आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे किनवट माहुर तालुक्याकरिता महत्वाचा असा मार्ग जो मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याचा प्रलंबित प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांनी तत्काळ सोडवावे अशी विनंती  नाईक यांनी केली.    तसेच या मार्गावरील इस्लापुर, जलधारा, बोधडी, कोठारी, घोटी, राजगड, कमठाला, सारखणी, वाई बाजार, गोंडवडसा या प्रमुख गावासह या मार्गावरील इतर गावांना सर्व्हिस रोड व अप्रोच रोड बनवण्यात न आल्याने, या गावातील जोड वाहतूकीला थेट महामार्गावर येण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडेही नाईक यांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले.  या संबधी संबधित कंत्राटदाराला जबाबदार धरुन मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होत असेल तर तशी कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


       यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या शिष्टमंडळात बाजास समितीचे सभापती अनिल कर्‍हाळे पाटील, माहुरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, माजी सभापती मारोती रेकुलवार, डॉ.रोहीदास जाधव, कचरु जोशी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages