‘स्वस्थ भारत, सुदृढ भारत’ कसा निर्माण होईल? - डॉ.सत्यजित ईबिते - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 9 October 2022

‘स्वस्थ भारत, सुदृढ भारत’ कसा निर्माण होईल? - डॉ.सत्यजित ईबिते

१० ऑक्टोबर, ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ या दुर्लक्षित दिनाच्या शुभेच्छा. इथे दुर्लक्षित हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे भारतीय समाज शारीरिक आरोग्याच्या तुलनेत मानसिक आरोग्याला किंचितही गांभीर्याने घेत नाही. डब्लूएचओच्या आरोग्याच्या व्याख्येत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचा समावेश होतो. सामाजिक आरोग्य हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरच अवलंबून असते हे तर सर्वश्रुत आहेच. परंतु शारीरिक आरोग्यही बहुतांशी मानसिक स्थितीवर अवलंबून आहे हे उमजण्याइतपत आपला समाज प्रगल्भ झालेला नाही. म्हणजे सगळ्याचा पाया असेलेले मानसिक स्वास्थ्यच जर दुर्लक्षित राहत असेल तर ‘स्वस्थ भारत, सुदृढ भारत’ कसा निर्माण होईल? मानसोपचार घेणे हे कमीपणाचे, दुबळेपणाचे, शरमेचे आणि एक कलंक(स्टीग्मा) समजला जातो. मानसिक रुग्ण म्हणजे ‘वेडा’ आणि  मानसोपचार तज्ञ म्हणजे ‘वेड्यांचा डॉक्टर’ ही बुरसटलेली आणि मागासलेली भारतीय विचारसरणी खोडण्याचा हा छोटासा प्रयत्न.


मानसोपचाराला लागलेला कलंक (स्टीग्मा) :


शीर्षकावरून थोड्या गोंधळाच्या शक्यतेमुळे आपण थोडक्यात पार्श्वभूमी पाहू. मानसोपचाराला लागलेला कलंक म्हणजे अपूर्ण ज्ञानाच्या आधारे मानसिक आजार व उपचाराविषयी नकारात्मक व काहीशी अस्पृश्य भावना समाजात तयार होणे. ही भावना पूर्वीच्या काळी कुष्ठरोगाबाबतीत अनुभवावयास मिळायची. मानसिक आजार म्हणजे मेंदूतील काही केमिकल्सच्या असमतोलामुळे भावना व विचार प्रक्रियेत येणारा अडथळा होय. उदा.नैराश्य, उदासीनता, अतिउत्साह, बायपोलार इ. परंतु सगळेच मानसिक रुग्ण मॅनीयाक (ठार वेडे/पागल) किंवा आत्महत्या किंवा इतरांस इजा करणारे अशी काहिशी प्रतिमा समाजात तयार झालेली आहे. यात मुख्य वाटा प्रसारमाध्यमांचा आहे. कारण चित्रपटात मानसिक रुग्णास याप्रकारे दर्शविले जाते व त्याचेच प्रतिबिंब समाजमनावर बिंबते. पण वास्तविकतः अशा गंभीर रुग्णांचे प्रमाण नगण्य असून बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणांचे असतात. 

        डॉ.सत्यजित ईबिते एम.बी.बी.एस. डीएमआरई

मानसोपचाराला कलंक मानणारे दोन वर्ग असतात- एक स्वतः रुग्ण आणि दुसरा त्याच्या सभोवतालची लोकं. रुग्णापासून आपणांस काही इजा होण्याची वा तो अचानक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता गृहीत धरून लोकं नकारात्मक भावना ठेऊन त्याला टाळतात. त्यामुळे रुग्ण एकाकी पडून त्याची मानसिक स्थिती आणखीनच चिघळून हे दुष्टचक्र वाढतच जाते. याने त्याला कौटुंबिक, राहती जागा, नौकरी व आत्मसन्मान याविषयीच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि जाहीर आहे तो ते समर्थपणे हाताळण्याच्या मानसिकतेत नसतोच. आणि याच कारणामुळे असे रुग्ण आपला आजार लपवितात व उपचार घेण्याच्या वा मानसोपचार केंद्रास भेट देण्याच्या भानगडीत पडत नाहीत कारण त्यांना भीती असते की लोक त्याला वेडा ठरवतील. अशाने या विनाउपचारी रुग्णाची संख्या वाढत जाते. कोरोनाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आपणांस अनुभवावयास मिळाली होती. भारतीय समाजात अंदाजे ३७%लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानसिक आजाराने त्रस्त आहेत. परंतु आपल्यातील लक्षणे ही मानसिक आजाराचा भाग आहेत याबाबतीत ते अनभिज्ञ आहेत. बरेचजण वरील नमूद भीतीमुळे तर काही निष्काळजीपणा तर काही अज्ञानीपणामुळे मानसोपचाराकडे पाठ फिरवतात. गमतीची गोष्ट सांगायची तर मानसिक आजाराचे प्रामुख्याने आढळणारे लक्षण म्हणजे ‘मला कसलाही मानसिक आजार नाही’ ही रुग्णाची भावना!


शारीरिक आणि मानसिक आजारातील भेदभाव न्याय्य आहे का? :


मानसिक आजाराला शारीरिक  आजारासारखाच एक सामान्य दोष मानायला आपला समाज तयारच होत नाही. मधुमेहामध्ये पॅनक्रियाजमधून इन्सुलिन नावाच्या केमिकलच्या कमी स्त्रावामुळे रुग्णास बाहेरून इन्सुलिन दिले जाते. हायपोथायरॉईडमध्ये थायरॉक्झीनच्या कमी स्त्रावामुळे बाहेरून थायरॉक्झीन दिले जाते. या शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आजारामध्ये सिरोटोनिन, बेन्झोडायझेपाईन्ससारख्या केमिकलच्या कमी स्त्रावामुळे डिप्रेशन येते म्हणून त्यास बाहेरून सिरोटोनिन (एसएसआरआय) दिले जाते. जर मधुमेह, हायपोथायरॉईडचे उपचार घेताना कोणताही न्यूनगंड वा शरमेची भावना नसते तर मग मानसोपचार घेताना तरी शरमेची भावना का असावी? मानसिक रुग्णांनी अशी कोणतीही भावना मनात न बाळगता खुलेपणाने मानसोपचार स्वीकारावा व समाजानेही अशा लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक चर्चा न करता  सहानुभूतीचा ठेवल्यास मानसिक आजाराविषयी लोक समोर येतील. पर्यायाने मानसिक स्वास्थ्य व त्या पर्यायाने शारीरिक, सामाजिक स्वास्थ्य व स्वस्थ भारत निर्माण होईल.

 -  जयवर्धन भोसीकर (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment

Pages