बिलोली ,जयवर्धन भोसीकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृत वाहिनी करण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्थां व समाज एकत्रितपणे काम करणार असून “चला जाणूया नदीला” या अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी "नदी संवाद यात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता अटकळी (ता.बिलोली) येथे मन्याड नदीकाठी "नदी संवाद यात्रेचा" शुभारंभ होणार असून मन्याड व लेंडी काठच्या गावातील अधिकाधिक जलप्रेमी व नागरिक याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्कृति संवर्धन मंडळ या संस्थेने केले आहे.
महाराष्ट्र शासन आणि जल बिरादरी या संस्थेच्यावतीने नद्यांबाबत जाणीव जागृती व्हावी याकरिता “चला जाणूया नदीला” हे अभियान राज्यभर राबविले जात आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंगजी राणा हे या यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सेवाग्राम वर्धा येथून दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी या अभियानाची सुरुवात झालेली आहे. या उपक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील लेंडी व मन्याड या दोन नद्यांच्या संवाद यात्रेची जबाबदारी सगरोळी (ता.बिलोली) येथील संस्कृति संवर्धन मंडळ या स्वयंसेवी संस्थेकडे दिली आहे. शनिवारी होणाऱ्या ह्या कार्यक्रमानंतर पुढील दोन महिन्यात प्रत्यक्ष नदी संवाद यात्रेस सुरुवात होईल. यावेळी नदीकाठचे नागरिक या यात्रेत मोठ्या संखेने सहभागी सहभागी होतील, यादरम्यान नदी अमृत वाहिनी करण्यासाठी नदी काठच्या नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन नदी विकासाबाबतचा आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येणार आहे. शनिवारी दि.१५ रोजी अटकळी (ता.बिलोली) येथे मन्याड नदीकाठी "नदी संवाद यात्रे"च्या शुभारंभ प्रसंगी अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे जलनायक तथा संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी केले आहे.
शनिवारी दि.१५ रोजी होणाऱ्या "नदी संवाद यात्रे"च्या आयोजनाबाबत नुकतीच अटकळी (ता.बिलोली) येथे बैठक घेण्यात आली होती. यावेळी लेंडी व मन्याड खोऱ्यातील जलप्रेमींनी मोठ्या संखेने उपस्थिती लावली होती.
No comments:
Post a Comment