कुर्माप्रथे विरुद्ध लढण्यास आदिवासी महिला आता झाल्या सज्ज, समाज बंध या संस्थेद्वारे सत्याचे प्रयोग शिबिर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 November 2022

कुर्माप्रथे विरुद्ध लढण्यास आदिवासी महिला आता झाल्या सज्ज, समाज बंध या संस्थेद्वारे सत्याचे प्रयोग शिबिर संपन्न

माणसांना माणसाशी जोडते ती संस्कृती,माणसांना माणसापासून दूर करते ती कुप्रथा. 

भामरागड येथील सत्याचे प्रयोग हे संकल्पपूर्वक शिबिर संपन्न

नाशिक :

भारत देशाचा गौरव विविधतेने नटलेला म्हणून केला जातो. प्रत्येकाच्या संस्कृती ,प्रथा, परंपरा वेगवेगळ्या ; खरंतर संस्कृती माणसांना माणसाशी जोडणारा 'पूल' आहे परंतु धर्मानुसार ,प्रांतानुसार अनेक चालीरीती ,प्रथांचा पगडा इतका खोलवर रुजलेला आहे की काही प्रथा माणसांना माणसापासून दूर सारत आहेत . काही प्रथा या जीवघेण्या ठरत आहेत,मग अशा प्रथा कुप्रथाच नाही का?


सगळीकडे महिला आरोग्य, स्त्री सशक्तिकरण, स्त्री -पुरुष समानतेचा डंका पिटला जातोय, परंतु काही भाग अजूनही दुर्लक्षितच आहे .तेथील महिला अजूनही अंधकारमय जीवन जगत आहेत .जगातली सर्वात मोठी नैसर्गिक देणगी स्त्रीला लाभलेली आहे ती आई बनण्याची म्हणजे आई बनण्याची. मासिक पाळी ही आई बनण्याची पहिली पायरी असते ,मग इतकी नैसर्गिक असलेली मासिक पाळी विटाळ, अशुद्ध कशी असू शकते?


काही आदिवासी भागामध्ये आजही महिलेला पाळीतल्या त्या पाच दिवसात वेगळं ठेवलं जातं. एका अंधाऱ्या, अस्वच्छ असुरक्षित कुडाच्या झोपडीत जिला आदिवासी भागात कुर्माघर असे म्हणतात. ही कुर्माप्रथा आजपर्यंत अनेक महिला मुलींच्या जीवावर बेतलेली आहे. सर्पदंश, विंचू चावणे,विविध आजार यामुळे महिलांचे जीव गेलेले आहेत. म्हणूनच या कुर्माप्रथेत सकारात्मक बदल व्हावा, पाळीस पूरक समाजनिर्मिती व्हावी हा उद्देश समोर ठेवून पुण्यातील समाजबंध ही संस्था 2016 पासून प्रबोधनाचे काम करीत आहे.


मागील एप्रिल महिन्यात भामरागडच्या काही भागात सत्याचे प्रयोग पहिले निवासी शिबीर राबविले गेले एकूण 14 गावांमध्ये 40 कार्यकर्ते आदिवासी बांधवांसोबतच राहून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रबोधन केले. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या परंतु आम्ही तुमच्या हितासाठी तुमच्या सोबत आहोत हा विश्वास त्यांच्यात निर्माण करू शकलो .यासाठी रोज महिलांचे सत्र घेणे , आशा पॅड वाटप व प्रशिक्षण किशोरी मुलींचे प-पाळीचे सत्र ,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ,पुरुषांची वारंवार संवाद, शेतावर जाऊन त्यांच्यासोबत मोहफुले वेचत विविध विषयांवर चर्चा करणे यातून त्यांना पाळी नैसर्गिक असून कुर्माप्रतथेची आता गरज नाही हे पटवून देण्यात काही प्रमाणात यश आले होते.


आदिवासी बांधवांसोबत त्यांच्या सहवासात राहून एक गोष्टीचा प्रत्यय आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला आला तो म्हणजे, आदिवासी बांधव खरंच खूप प्रेमळ आपुलकीने वागणारी आहेत तितकीच ती निसर्गपूजक संस्कृतीप्रिय सुद्धा आहेत . त्यांच्याशी आमची नाती तयार झाली वारंवार ते आमच्या संपर्कात आहेत .काहीही जसे की आरोग्य ,शिक्षण विषयक समस्यावर ते आता आमच्या सोबत मनमोकळेपणाने आणि  हक्काने बोलू लागले . पहिला सत्याच्या प्रयोगानंतर काही गावांमध्ये जे सकारात्मक बदल झाले ते इतरही गावांमध्ये व्हावेत महिला कुर्मा घरात न राहता घरातच रहाव्यात, वेळोवेळी त्यांना मासिक पाळीतील स्वच्छता, आरोग्य ,आहार यांची माहिती मिळत राहावी यासाठी प्रत्येक गावामध्ये आरोग्य सखी नेमण्यात आली .काही गावात युवक युवतींचे गट तयार करण्यात आले यामुळे विविध विषयावर, मासिकपाळीवर प्रत्यक्ष खुलेपणाने न बोलणाऱ्या महिला आता बोलत आहेत. प्रभावीपणे आपापली मते मांडू लागले आहेत. समाजबंध जे काम करतोय ते आपल्या आरोग्याच्या हिताचे आहे हे त्यांना आता पटू लागले आहेत.


एम दिवाळीत 22 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान सत्याचे प्रयोग दुसरे निवासी शिबिर घेण्यात आले . यावेळी 10 गावांमध्ये समाजबंध चे कार्यकर्ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करीत होते . चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा,विविध खेळांच्या स्पर्धा , कुर्मा प्रथेवर भाष्य करणाऱ्या नाटिका ,रांगोळी स्वच्छ गाव स्वच्छ पानवटा निरोगी गाव इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीसोबत प्रत्यक्ष संवाद साधत कुर्मा प्रथेबदल प्रत्येकाची मतं जाणून घेतली .एप्रिलच्या पहिल्या शिबिरामुळे मासिक पाळीवर महिला आता प्रत्यक्षपणे बोलत होत्या .दिवाळीच्या सुट्ट्यात शालेय मुले ,महाविद्यालयीन युवा वर्ग आपापल्या गावी आले होते त्यांची मते सर्वेक्षणाच्या माध्यमातून कुर्माप्रथेबद्दल जाणून घेतली असता आता कोणालाही "ही प्रथा नको आहे "असे निदर्शनास आले.


पहिल्या शिबिरामुळे सकारात्मक बदल हा जाणवला की, पहिल्या सत्याच्या प्रयोग मधील सभांना महिलांना रोज बोलवायला लागायचे .परंतु दुसऱ्या शिबिरामध्ये हे चित्र मात्र पूर्ण पालटले होते. महिला स्वतःहून सभेला रोज न चुकता येत होत्या. उघडपणे कुर्मा प्रथेला विरोध करत होत्या .काही महिला युवतीने तर कुर्माप्रथा पूर्णपणे पाळणे बंद केले होते .प्रत्येक कार्यक्रमात महिला, पुरुषांचा , मुलांचा युवक युवतीचा सहभाग वाढला होता .गावांमध्ये प्रभातफेरीमध्ये 'पाळी नैसर्गिक आहे' ,'आम्ही कुर्मा पाडणार नाही', न पाळल्यास दंड आकारणार नाही अशा घोषणा देत होते .कुर्मा प्रथा निमुटपणे पाळणाऱ्या महिला ,मुली आता घरातील पुरुषांना सांगू लागल्या .त्या विरोधात बंड करू लागल्या .एकंदरीत त्या आता  स्वतःचा स्वातंत्र्यलढा स्वतः लढायला सज्ज झाल्या आहेत.


आम्ही कुर्मा प्रथा पाडणार नाही या शपथपत्रावर जवळपास 400 महिलांनी अंगठे ,स्वाक्षऱ्या करीत कुर्माप्रथेला आपला विरोध दर्शविला. दिवाळीत सुद्धा काही महिला या कुर्माघरात होत्या. गरज नसतानाही प्रथा पाडणे हे महिलांवर होणारा अन्यायच आहे .दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशासारखे येथील महिलांचे जीवन सुद्धा कुर्मामुक्त व्हावे आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा नंदादीप सदैव तेवत असावा यासाठी समाजबंध आणि कायम महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील .आदिवासी महिलांचं मुलींचं विशेष कौतुक वाटतं की त्या स्वतः आता या कुर्मा प्रथेविरुद्ध लढायला सज्ज झाल्या आहेत. अनेक वर्षापासून निमुटपणे कुर्मा पाडणाऱ्या अनेक महिलांचा त्या आता आवाज बनत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages