आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 26 November 2022

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा

नवी दिल्ली, 26 : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज आयोजित ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रमात गणपती वंदना, भुपाळी, जात्यावरील ओवी, भारूड, गौळण, लावणी, जोगवा, कोळीनृत्य, पोवाडा, शिवराज्यभिषेक आदि महाराष्ट्राच्या समृध्द लोककलांचे दमदार सादरीकरण झाले. राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाने  उपस्थितांची  मने जिकंली.


            येथील प्रगती मैदानावर 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात  महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन  झाले. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार, निलेश केदार (प्रभारी) आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे  महाव्यवस्थापक विजय कपाटे  उपस्थित  होते.


            भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळव्यात दररोज सायंकाळी ‘खुल्या सभागृहात’ व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळाव्याच्या 13 व्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.


महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण


             कोल्हापूरच्या श्रिजा लोकसंस्कृती फाउंडेशन समुहाच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र लोक कला दर्शन’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणपती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर भूपाळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. शेती दिनचर्येशी संबधित नृत्य सादर करण्यात आले.  मंगळागौर सणाची झलकच यावेळी रंगमंचावर पहायला मिळाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असलेला पोतराजचे सादरीकरण आजच्या कार्यक्रमात झाले. कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगीतांचे सादरीकरणही  झाले.  लोकगायन आणि लोकनृत्याच्या सादरीकरणाने समा बांधला. यल्लमाच वार भरल अंगात.. गाण्याने भक्तिमय वातवरणात केले. बाई माझ्याग दुधात नाही पाणी...... गवळण गायली गेली. तुझ्या उसाला लागेल कोल्हा..... ही गाजलेले लावणी गायली गेली, प्रेक्षकांनी यावर दाद दिली. नव्या-जुन्या गाण्यावर  मनमोहक मराठमोळी लावणी सादर करण्यात आली. शेवटी पोवाडा आणि शिवराज्यभिषेक सादर करण्यात आला.  


            लावणी ,गौळण, शेतकरी नृत्य, कोकणी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.  विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या  कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त  प्रतिसाद लाभला.


No comments:

Post a Comment

Pages