बिरसा मुंडा यांना अभिवादन करत मोतीरामच्या शेतात जेंव्हा विहिरीचे भूमिपूजन होते! ; जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी लाभार्थी मोतिरामचा बांधावर जाऊन केला सन्मान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 November 2022

बिरसा मुंडा यांना अभिवादन करत मोतीरामच्या शेतात जेंव्हा विहिरीचे भूमिपूजन होते! ; जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी लाभार्थी मोतिरामचा बांधावर जाऊन केला सन्मान

नांदेड  दि. 15 :- भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हमी नुसार दुर्बलतर घटकांसाठी शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमार्फत क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील वाडी-वस्तीवर असलेल्या शेतकऱ्यांना विहिरीची योजना ही त्यांचे जीवनमान उंचावणारी ठरली आहे. आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे लाभधारक मोतिराम पिराजी तोटावाड या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अभिवादन केले. अल्पभूधारक असलेल्या मोतीराम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला या आगळ्या अभिवादनाने समाधानासह आश्वासकता मिळायला वेळ लागला नाही.

 

ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्या मनात योजनेप्रती विश्वासार्हता निर्माण व्हावी, लाभधारकाला ती योजना आपली वाटावी व त्याचेही सकारात्मक समाधानी योगदान त्यात मिळावे या उद्देशाने जिथे-जिथे शक्य असेल तिथे मी भेट देण्याचा प्रयत्न करते, या शब्दात वर्षा ठाकूर-घुगे यांनी लाभधारकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मोतीराम यांच्या शेतातील विहिरीचे भूमिपूजन करतांना या परिवाराच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा शासकीय सेवक म्हणून आम्हालाही बळ देणारा आहे, असे त्या म्हणाल्या.  

 

अल्पभूधारक शेतकरी असल्याने या एक हेक्टर व काही गुंठ्यात उज्जवल भविष्याचा मार्ग दिसत नव्हता. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे आता या शेतीतून खूप काही मनासारखे करता येईल. आमच्या गावात पोकरा योजना असल्याने त्याचाही अप्रत्यक्ष आम्हाला लाभ होईल असे मोतिराम तोटावाड या शेतकऱ्याने सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पेरूची लागवड करण्याचे माझे स्वप्न आता साकार होत असल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाल्याचे मोतिराम यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Pages