किनवट, दि.29 (प्रतिनिधी) : गोकुंद्यातील स्व.बाळासाहेब ठाकरे चौक हा दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होऊ लागला आहे. रोडरोमिओंचा विद्यार्थींसह महिलांना होणारा वाढता त्रास पाहता चौकात पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी घेऊन किनवट तालुका पत्रकारसंघाने गुरूवारी किनवट पोलिसांकडे गुरूवारी निवेदन सादर केले होते. त्यानंतर लगेच रविवारी जोशीज कोचिंग क्लासेस व एकलव्य करिअर अकॅडमीच्या संचालकांनीही या सख्याहरींचा त्वरित बंदोबस्त करावा, या आशयाचे निवेदन पोलीस स्टेशनला दिले. तुर्तास गोकुंदा येथे एखादा पोलीस कर्मचारी ठेवण्यात येईल असे आश्वासन सपोनि.गणेश पवारांनी दिल्याचे समजते.
यावेळी गोकुंदा ग्रामपंचायतीने रीतसर ठराव घेऊन पोलीस चौकीची मागणी केल्यास पोलीस चौकीसुद्धा मिळेल असेही किनवट पोलीस ठाण्याचे सपोनि.पवार म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयापासून ते स्व.बाळासाहेब ठाकरे चौकापर्यंत पोलीस यंत्रणा दिल्याशिवाय रोडरोमिओंच्या उद्रेकाचा बिमोड होणार नाही. पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी किनवट पोलिसांत वेळोवेळी तक्रारी दिल्या परंतु,फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता मात्र पत्रकारांच्या निवेदनाची दखल घेतली जाईल असे दिसते.
गोकुंद्यातील स्व.बाळासाहेब ठाकरे चौकात अधूनमधून हाणामारी, मुलींमागे कर्णकर्कश हार्न वाजवीत मोटारसायकलने पाठलाग करणे, मुलीं व महिलांना त्रास होईल असे असभ्य वर्तन, शिट्या,टोमणे मारणे आदी प्रकार रोडरोमिओंकडून सर्रास होत असून, पालकांसह नागरीक वैतागूनसुद्धा बदनामीच्या भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या रोमियोंचे फावत असून, धैर्य वाढून हा चौक अतिसंवेदनशील केल्या जात आहे. त्यामुळेच पोलीस प्रशासनाने यांना वेळीच आवर घालण्याची मागणी करण्यात येत असून, पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोकुंदा ग्रामपंचायतीने बळीराम पाटील महाविद्यालयापासून ठाकरे चौक ते महात्मा फुले महाविद्यालयापर्यंत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याचे औदार्य दाखवण्याची आवश्यकता असून, ग्रा.पं.ने पोलीस चौकीसाठी ठराव घेऊन पोलीस प्रशासनाला पाठपुरावा करावा असे पत्रकारांसह पालकांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment