अतिक्रमणधारकांनी मागे केलेल्या हल्ल्यातील एका व्यापार्‍याचा मृत्यू ; ना.मुनगंटीवारांची चौकशीत दिरंगाई करणार्‍या पोलीस निरीक्षकांना निलंबित करून चौकशीची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 29 December 2022

अतिक्रमणधारकांनी मागे केलेल्या हल्ल्यातील एका व्यापार्‍याचा मृत्यू ; ना.मुनगंटीवारांची चौकशीत दिरंगाई करणार्‍या पोलीस निरीक्षकांना निलंबित करून चौकशीची मागणी

किनवट. दि. 28 (प्रतिनिधी) : अतिक्रमण केलेले टीनपत्र्याचे घर खाली करण्यासाठी गेलेल्या दोन व्यापार्‍यांवर अतिक्रमणधारकांनी केलेल्या हल्यात एका व्यापार्‍याचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ह्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, राज्याचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांनी ह्या प्रकरणातील आरोपींना अटक करून  सत्वर कार्यवाही होणे आवश्यक असतांनाही, तपासकामात विलंब लावणार्‍या पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच आर्यवैश्य समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी व किनवट व्यापारी असोसिएशन ह्यांच्यातर्फे गुरूवारी (दि.29) किनवट-गोकुंदा बंदची हाक दिली आहे. आज बुधवारीसुद्धा किनवट शहरातील व्यापारपेठ व सराफा बाजार कडकडीत बंद होता.


    ह्या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, दि. 12 डिसेंबर रोजी किनवट शहरातील रंगवैभव सिलेक्शन ह्या कापड दुकानाचे मालक व्यंकटेश कंचर्लावार हे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन अनधिकृत केलेले अतिक्रमण काढून घ्या, असे सांगत असतांना त्यांच्यावर अचानक संगनमत करून विकास अशोक कोल्हे, विशाल अशोक कोल्हे, संतोष शिवराम कोल्हे, किशोर शिवराम कोल्हे, अशोक शिवराम कोल्हे ह्या पाच जणांनी मिळून लाठयाकाठ्या दगडांनी त्यांना मारहाण केली असता, व्यंकटेशने आपले वडील बंधू अक्षय ज्वेलर चे मालक श्रीकांत  कंचर्लावार ह्यांना मोबाईलद्वारे माहिती देऊन मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी बोलवून घेतले. श्रीकांतने तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी गैरकायद्याची मंडळी जमवून व्यंकटेशला मारहाण करणार्‍या आरोपींनी श्रीकांत कंचर्लावार यांनासुद्धा मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून पळून गेले. ह्या घटनेनंतर दोन्ही व्यापारी भावांना लगेच प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे दाखल केले असता दोघांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले.  दि.12 डिसेंबर पासून मृत्युशी झुंज देणारे सराफा व्यापारी श्रीकांत कंचर्लावार ह्यांचा उपचारादरम्यान दि.27 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचे लहान बंधू व्यंकटेश ह्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असे कळते. ह्या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली असून, दहशतीचे वातावरण आहे.


       घटनेच्या दिवशी अक्षय ज्वेलर्समध्ये काम करणारे रमेश विठ्ठल नेम्मानीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरील आरोपींच्या विरोधात किनवट पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करणे किनवट पोलिसांना का जमले नाही असा सवाल व्यापारी असोसिएशनने उपस्थित केला आहे. ह्या घटनेच्या नंतर लगेच व्यापारी असोशीएशन किनवट ह्यांनी निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलीस आरोपींचा शोध घेण्यात असमर्थ ठरून पुढे त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मंगळवारी (दि.27)  श्रीकांत कंचर्लावार ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य आर्यवैश्य समाज संघटनेच्यावतीने वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ह्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांच्याशी  दि. 28 रोजी पत्रव्यवहार करून ह्या गुन्ह्याच्या तपासात विलंब करणारे किनवटचे पोलिस निरीक्षक यांचे तत्काळ निलंबन करून त्यांचे विरूद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी व यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे किनवट शहरात दहशत निर्माण झाली असून, अशा गंभीर प्रकरणात पोलिसांकडून सत्वर कार्यवाही होणे आवश्यक आहे. परंतु,ती न झाल्याने पोलीस व्यवस्थेविरुद्ध प्रचंड नाराजीचे वातावरण तयार झाले आहे असे मुनगंटीवारांनी पत्रात नमूद केले आहे.


     आज बुधवारी किनवट शहरातील किराणा भुसार, सराफा असोशीएशन व महाराष्ट्र आर्यवैश्य समाज महासभेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आमदार भीमराव केराम ह्यांना निवेदन देऊन गुरूवार (दि.29) रोजी किनवट-गोकुंदा बंदचे आवाहन केले आहे व जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह पोलिस स्टेशनला ठेऊत आणि त्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका बंदची हाक दिलेल्या सर्व संघटनांनी घेतली आहे.


 मयत श्रीकांत कंचर्लावार ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असून मयताचे 2 डोळे, 2 किडनी, यकृत, ह्रदय, फुफुसे दान करण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे पार्थिव आज रात्री उशिरा किनवट येथे आणण्यात येणार असून उद्या गुरूवारी (दि.29) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.


 या प्रकरणी ह्या तीन आरोपींच्या विरोधात गुरन/240/2022 कलम 360 324 143 147 148 149 504 506 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून, मयत श्रीकांत ह्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ह्या गुन्ह्यात 302 कलम वाढवण्यात येईल असे पोलिसांनी संगितले. ह्या प्रकरणी पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार हे ह्या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.


   ह्या गुन्ह्यातील 5 आरोपींपैकी किशोर शिवराम कोल्हे व अशोक शिवराम कोल्हे ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ह्या गुन्ह्यातील संतोष शिवराम कोल्हे, विशाल अशोक कोल्हे, विकास अशोक कोल्हे हे तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Pages