प्रबोधन चळवळीतील शिलेदार शाहीर संभाजी गायकवाड - महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 December 2022

प्रबोधन चळवळीतील शिलेदार शाहीर संभाजी गायकवाड - महेंद्र नरवाडे

       

      शाहीर संभाजी गायकवाड यांचा जन्म २५एप्रील१९५५साली वडील फकीरा गायकवाड व आई शांताबाई यांच्या पोटी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव साखर कारखाना येथे झाला.आजोबा केरुबाबा नागुजी गायकवाड , चुलते दगडु केरुबाबा गायकवाड व त्यांचें आईवडील मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दिनवाडा या गावचे.ही सर्व मंडळी कामानिमित्त हरेगाव साखर कारखाना येथे आले व तेथेच त्यांना काम मीळाले.२० मे.१९३९ साली हरेगावी डॉ बाबासाहेब आंबेडकर सातव्या अधिवेशन साठी आले होते.तेव्हा ते केरुबाबा गायकवाड यांच्या घरी थांबले होते.ज्या पलंगावर बाबासाहेब बसले होते तो पलंग आजही फकीरा गायकवाड यांनी म्हणजे शाहीर संभाजी गायकवाड यांच्या वडिलांनी जपून ठेवलेला आहे असे संभाजी गायकवाड यांनी सांगितले.तेव्हा पासून महाकवी वामनदादा कर्डक हरेगावी येत असत. 


दादा लोकांच्या प्रेमापोटी येत .  पुढे त्यांचं येणं जाणं वाढलं . आजोबा केरुबाबा गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काम करायचे.संभाजी गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी   डॉ .बाबासाहेब आंबेडकर व महाकवी वामनदादा कर्डक  यांच्या शिवाय कुणालाही आदर्श मानले नाही.त्याकाळी केरुबाबांनी वामनदादा यांचं लग्न औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील थोरात कुटुंबातील मुलीसोबत लावले.ही आठवन त्यांनी बोलताना सांगीतली .वडील फकिरा गायकवाड त्यांच्या गावीच राहतात ते ९७ वर्षाचे आहेत.हरेगावी आल्यावर वामनदादा गायकवाड कुटुंबात  राहायचे.वामनदादानी स्थापन केलेल्या मराठवाडा मिलिंद गायनपार्टीत वामनदादा कर्डक प्रभावी गायन करायचे. त्यांच्या प्रभावाने संभाजीना गीत गाण्याचा छंद जडला.हरेगाव येथील मराठवाडा मिलिंद गायनपार्टीतील मंडळी अध्यक्ष अण्णाभाऊ काशिनाथ खरे,मुख्य गायक लक्षीमन तान्हाजी खरात, हार्मोनियम वादक फ्रान्सिस शांत्वन भोसले,ढोल वादक मारोती आनंदा दिवे,नाल वादक सुकाजी उबाळे बाबा,रामबाबा मोहन, तबलावादक सिताराम अण्णाभाऊ खरे,झांजरी वादक कचरुजी येवले, रामभाऊ काळुजी सोळस यांच्या सह दुय्यम गायक संभाजी गायकवाड. ही मंडळी जिथे निमंत्रण येईल तिथे जाऊन प्रबोधन करीत.


संभाजीचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत अकरावी पर्यंत हरेगावी झाले.ते एकुलते एक असल्याने तेही शिक्षणानंतर साखर कारखान्यात कामाला लागले. त्यांचा विवाह १२मे १९७९ला औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव या गावचे आंबेडकरी चळवळीतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जवळचे ज्योतीराम भागाजी निकम यांची मुलगी जयंती हिच्याशी झाला.लग्नानंतर संभाजी गायकवाड तिला जया म्हणतात.१९८०मध्ये संभाजी गायकवाड आणि परिवाराने हरेगाव साखर कारखाना बंद पडल्याने हरेगाव सोडले व औरंगाबाद ला स्थाईक झाले.येथे ते आल्यावर मातीच्या व पत्र्याचा घरात राहत व मिळेल ते कामधंदा करत अशा परिस्थितीत मोठी मुलगी रंजना  हिला वकील तर लहान मुलगी निर्मला हिला अकरावी पर्यंत शिकवून ब्युटी पार्लरचे शिक्षण दिले.सध्या शाहीर संभाजी गायकवाड ॲड.रंजना गायकवाड यांच्याकडेच राहतात.सुरुवातीला  येथील भजन पार्टीतील गायक कलावंत ओळखीचे नव्हते पण दादांचं गाणं गाण्यासाठी ते सायकलवर जाऊन तिथे संधी मागायचे.असे करत वामनदादा कर्डक यांची गाणी गात गात वामनदादाचा सहवास लाभला . त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या वर कवीता लिहिली,आईवर कविता लिहिली.त्यांच्या कथा व कविता गरीबी मुळे प्रकाशित झाल्या नाहीत. 


शाहीर उत्तमराव मस्के यांच्या सोबत त्यांनी अनेक कार्यक्रमाला हजेरी लावली. ज्या ज्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत असत त्याची बातमी दैनिक लोकमत मध्ये आल्यावर ती बातमी वाचून संभाजी गायकवाड तेथे जायचे.तिथे वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे प्रथम संचालक प्रा.युवराज धबडगे हे त्यांना गीत गाण्यासाठी संधी द्यायचे  वामनदादा ची जुणी गाणी सर्वांना आवडायची. कारण ही जुनी गाणी कुणी गात नसे व माहिती नसे. अशाच कार्यक्रमात मराठी विभागात ही आयोजित कार्यक्रमात संधी मिळाली तेंव्हा सध्या संचालक पदी असलेले प्रा.उत्तम अंभोरे यांनी गायकवाड यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला.राघोजी कोंडदेव हायस्कूल, वाळुज पंढरपुर औरंगाबाद येथे त्यांना वामनदादा कर्डक यांच्या कार्यक्रमात प्रा.युवराज धबडगे यांनी निमंत्रित केले तेथेही त्यांनी वामनदादा कर्डक यांची गाणी पहाडी आवाजात सादर करुन वाहवा मिळवली.एकदा औरंगाबाद येथे वामनदादा कर्डक यांच्या जीवन गौरव ग्रंथाचे कार्यकारी मंडळ तयार झाले त्यात अध्यक्ष ॲड.बी.एच.गायकवाड,  मधुकर भोळे,म.न.पा.औरंगाबादचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे, पत्रकार बाबा गाडे, संभाजी गायकवाड, बाळकृष्ण गवई, सिद्धार्थ जाधव,विजयानंद जाधव आदी मंडळी होती.वामनदादा कर्डक यांच्या उपस्थितीत संत एकनाथ मंदीर औरंगाबाद येथे दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते वामनदादा कर्डक जीवन गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले.हा ग्रंथ महाराष्ट्र भर गेलेला आहे.तसेच हरेगावी  कलावंतासाठी पाठविण्यात आला.


    वामनदादांची पुढील गीतं शाहीर संभाजी गायकवाड आपल्या पहाडी आवाजात आवडीने तसेच प्रभावीपणे  सादर करतात.

१) उभ्या आभाळाखाली नव्हता आम्हास वाली

जन्मा येऊनी भिमा कुळास उद्धारिले

२)ममता मातेपरी,भिमराया तुझी ममता मातेपरी ...

३)असा काळ येईल,जुनं खुळ जाईल.

भिमा विश्व सारे तूझे गुण गाईल

४)भिमाने जो दिला धम्म मला तो पाळणे आहे...

५)माणसा इथे मी तूझे गीत गावे,

असे गीत गावे की,तूझे हीत व्हावे.

६)आई तूझा मी नंदन आहे

पायी तूझ्या हे वंदन आहे.

७)छंद लागो तूला शिक्षणाचा मुला

नको भटकू असा नको भटकू असा...

८)आला जमाना कडकीचा चाकर ना मी दिडकीचा

९)दिसेना धनाजी,मिळेना अनाजी

कारण या गोष्टीला, आहे गुणाजी

१०)आन घ्यारे भिमाच्या गळ्याची

निगा राखा,आता मळ्याची.

    अशी एकापेक्षा एक सरस गाणी गाणारे श्रेष्ठ गायक कलावंत म्हणून शाहीर संभाजी गायकवाड आज सर्वदूर परिचित आहेत.


त्यांची पत्नी जया यांची साथ मिळाल्याने वामनदादा कर्डक समाजासमोर मांडतोय असे ते आवर्जून सांगतात.त्यांना दोन मुली आहेत रंजना व निर्मला.संसाराची जबाबदारी वाढल्याने कोणत्याही पार्टीत सहभागी झालो नाहीअसे ते नमुद करतात.वामनदादाची गाणी गाणारा जेष्ठ गायक म्हणून परिसरात ओळख झाल्याने त्यांचा अनेक मान्यवरांनी  अनेक ठिकाणी सत्कार केला.

    दै.लोकमतचे स.सो.खंडाळकर जेष्ट पत्रकार औरंगाबाद, ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. औरंगाबाद चे आमदार संजय सिरसाठ यांचे हस्ते ही सत्कार करण्यात आला. वामनदादा कर्डक यांच्या देशवंडी गावचे सि.आय.डी.अधिकारी मुंबई हुन औरंगाबाद येथे विद्यापिठात आले असता वामनदादा कर्डक यांच्या आठवणी सांगणारा गायक कोण आहे असे विचारले असता साहित्यिक प्रा.ऋषिकेश कांबळे सर यांनी अधिकारी अर्जुन डोमाडे यांना घरी पाठवले व त्यांनी विचारपुस केली.


औरंगाबादमध्ये गांधी भवन येथे जेष्ठ गायक म्हणून डॉ.सचिन भालेराव यांनी संस्थेच्या वतीने सत्कार केला. नगरसेवक कृष्णाजी बनकर,दैनिक लोकमतचे जेष पत्रकार स.सो.खंडाळकर,गोडाने सर,माजी सभापती एकनाथ त्रिभुवन, समाजसेविका कांचन ताई सदाशिवे यांच्या उपस्थितीत कवी गायक उत्तमराव मस्के व जेष्ठ गायक संभाजी गायकवाड यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला.


संदेश

      तरुण युवकांसाठी संदेश देताना शाहीर संभाजी गायकवाड म्हणतात "जी माणसं कधी शाळेत गेली नाही काही शाळेच्या बाहेर राहून शिकली ती महान विद्वान झाली." आता तर सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महाकवी वामनदादा कर्डक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खूप मोठे व्हा, निर्व्यसनी रहा, महामानवाचे ग्रंथाचे वाचन करुन आदर्श जीवन जगा, सज्जनांच्या संगतीत राहून स्वतः ला घडवा असा मौलिक संदेश देतात.


       शाहीर संभाजी गायकवाड यांचा अपघात होऊन पाय फ्र्याक्चर झाल्याचे कळले कमावते तेच असल्याने आर्थिक अडचणीत आहेत  अनेक जन त्यांना विचारपूस करण्यासाठी भेट देत आहेत .आपणही त्यांची विचारपूस करुन थोडीफार मदत करत मी महेंद्र नरवाडे,किनवट  त्यांच्या प्रबोधन चळवळीतील कार्याचा आढावा घेतलाअसता त्यांनी मनमोकळ्या पद्धतीने सांगुन मन हलके केले.लवकर बरे व्हावे व वामनदादा चा वारसा पुढे नव्या उमेदीने चालू ठेवावा ही सदिच्छा !

 

 -महेंद्र नरवाडे, किनवट ( नांदेड )

        मो.न.९४२१७६८६५०.

No comments:

Post a Comment

Pages