गोवर प्रतिबंधक लस घेण्यासाठी पालिकेतर्फे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 January 2023

गोवर प्रतिबंधक लस घेण्यासाठी पालिकेतर्फे आवाहन

किनवट. दि.30 (प्रतिनिधी) : शहरातील काही वार्डातील बालकांना गोवर या रोगाची लागण झाल्याचे आढळून आलेले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून, शहरातील 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना गोवरची लस अद्याप पर्यंत देण्यात आली नाही, अशा सर्व बालकांना त्यांच्या पालकांनी शहरातील नागरी दवाखाना व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे मोफत उपलब्ध असलेली गोवर प्रतिबंधक लस त्वरित देण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.


       किनवट शहरातील इस्लामपुरा प्रभागामध्ये गोवर रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे, पालिका प्रशासन अलर्ट मोड मध्ये येऊन रोगाचा फैलाव होण्यापूर्वीच त्याला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इस्लामपुरा भागातील बालकांना गोवर प्रतिबंधक लस घेण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी घरातील कुटुंबप्रमुख, ज्येष्ठ नागरिक, मौलवी, सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने पुढाकार घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांमध्ये सर्दी,ताप, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंगावर पुरळ येणे अशी लक्षण दिसल्यास, हयगय न करता तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. शहरातील सर्व नागरिकांनी आपआपला परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. सोबतच गोवर प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत सर्व्हेक्षण करणार्‍या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना आवश्यक ते सहकार्य  करावे. शहरात गोवर रुग्णांची संख्या सद्य:स्थितीत नियंत्रणात आहे. ही स्थिती असली तरी नागरिकांनी काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे बालकांना द्यावयाच्या विविध स्वरूपाच्या लसी वेळोवेळी देऊन आपल्या पाल्याच्या आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन पालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages