बौद्ध तत्वज्ञान रुजलेल्या भूप्रदेश आणि लोकांचे मंगल झाले ; बावरीनगर धम्मपरिषद उद्घाटनप्रसंगी खा.भदंत अतुरलिये रतन थेरो - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 January 2023

बौद्ध तत्वज्ञान रुजलेल्या भूप्रदेश आणि लोकांचे मंगल झाले ; बावरीनगर धम्मपरिषद उद्घाटनप्रसंगी खा.भदंत अतुरलिये रतन थेरो


  नांदेड (प्रतिनिधी ) - भारत हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाच्या जन्मामुळे पावन पवित्र झालेला महान देश आहे. जागतिक स्तरावर भगवान बुद्धाच्या विचारांचा-उपदेशाचा मोठा प्रभाव आहे. बौध्द तत्वज्ञानाची ओंजळभर बीजे जगाच्या कानाकोपर्‍यात रुजली गेली आणि त्या-त्या सर्व देश आणि भूप्रदेशांचे सर्वार्थाने मंगल झाले असा धम्मोपदेश श्रीलंका सरकारमधील विद्यमान खासदार आणि बौध्द धम्माचे धम्मगुरु पूज्य भदंत अतुरलिये रतन थेरो यांनी केला. 

तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे दि. ६ जानेवारी रोजी संध्याकाळी ३६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन झाले. या धम्मपरिषदेचे उद्घाटक म्हणून धम्मदेसना देताना पू. भदंत अतुरलिये रतन थेरो लाखोंच्या संख्येने उपस्थित उपासकांना धम्मदेसना देताना ते बोलत होते. धम्मपरिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुळावा येथील भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर हे होते. प्रारंभी उद्घाटन सोहळ्यात ‘संबोधी’ स्मरणिकेचे प्रकाशन पू. भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो आणि उपस्थित भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी इंग्लंड येथील पू. भिक्खू चंद्रबोधी महाथेरो, श्रीलंका येथील पू.भिक्खू कुरुज्ञागल इंदरतन थेरो, ब्रह्मदेश येथील पू.भिक्खू अशीन कोमल थेरो तर थायलंड येथील पू.भिक्खू नराँग आणि पू. भिक्खू नोट यांची प्रमुख उपस्थिती होती. 

धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना खासदार पू. भिक्खू अतुरलिये रतन थेरो यांनी श्रीलंका हा बौद्ध देश म्हणून जगाच्या पटलावर वावरत आहे त्याचे संपूर्ण श्रेय बौद्ध भूमी असलेल्या भारत देशाला जाते असे सांगितले. जगाच्या पाठीवर अनेक बौद्ध राष्ट्रे आहेत. त्या सर्वांनी तथागत भगवान बुद्धाचा महान धम्म स्वीकारला आणि अंगिकारला त्यामुळे ते सर्व देश आज आचरणशील धम्मजीवन जगत आहेत. धम्मामध्ये समानतेला मोठे महत्व आहे. तेथे उच्च-नीचतेला, गरिब-श्रीमंतीला वाव नाही. श्रीलंकेमध्ये आम्हाला जे काही मिळते ते आम्ही बौद्ध आहोत म्हणून, या ठिकाणचे प्रश्न आम्ही सामंजस्याने सोडवितो त्याचे कारण मोठ्या प्रमाणावर बौद्ध वचनांचे श्रीलंकेमध्ये पालन केले जाते असेही त्यांनी धम्मदेसनेत स्पष्ट केले. 

उद्घाटन सत्रात पू. भिक्खू प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो, पू.भिक्खू अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो, पू.भिक्खू सुमेधबोधी महाथेरो, पू.भिक्खू बोधीपालो महाथेरो, पू.भिक्खू विशुद्धानंद महाथेरो (बुद्धगया), पू.भिक्खू महापंथ महाथेरो (नागपूर), पू.भिक्खू प्रज्ञादीप, पू.भिक्खू प्रा.डॉ.एम.सत्यपाल थेरो, पू.भिक्खू दयानंदजी महाथेरो, पू.भिक्खू एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, पू.भिक्खू डॉ. एस. काश्यपायन थेरो (जयसिंगपूर), पू.भिक्खू डॉ. ज्ञानदिप थेरो, पू.भिक्खू विनयबोधीप्रिय थेरो, पू.भिक्खू करुणानंद थेरो, पू.भिक्खू विपश्यनाचार्य पञ्ञारत्न  थेरो आदिंसह विविध प्रांत आणि देशातून आलेल्या भिक्खू संघाने उपस्थित बौद्ध उपासकांना धम्मोपदेश दिला. 

आज धम्मपरिषदेचा समारोप होणार 

तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभडच्या ३६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेचा आज   रात्री दि.७ जानेवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर आपल्या अध्यक्षीय धम्मदेसनेने समारोप करणार आहेत. 

आज दिवसभर बौद्ध धम्म परिषदेमध्ये भिक्खूंची धम्मदेसना, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार, प्रमाणपत्र वाटप आदि कार्यक्रम घेण्यात आले. बौद्ध धम्म परिषदेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. धम्मपरिषदेत लावण्यात आलेले शेकडो पुस्तकांचे स्टॉल उपासकांचे आकर्षणाचे केंद्र ठरल्याचे दिसून आले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून तसेच नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून उपासकांनी धम्मपरिषदेसाठी मोठी गर्दी केली. एस.टी.महामंडळाच्या वतीने विविध भागातून परिषदेसाठी वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली. 

संयोजक तथा महाविहार बावरीनगर तीर्थक्षेत्र विकास सुकाणू समितीचे कार्यकारी अध्यक्ष महाउपासक डॉ.एस.पी. गायकवाड यांनी या परिषदेचे सुयोग्य नियोजन केल्याचे दिसून आले. परिषदेच्या विविध सत्रांचे संचालन प्रा.डॉ.मिलिंद भालेराव यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages