सांघिक भावना ठेवून स्पर्धा यशस्वी करा -कुलगुरू डॉ. प्रमोद येवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 8 January 2023

सांघिक भावना ठेवून स्पर्धा यशस्वी करा -कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

          औरंगाबाद  दि 08- महसूल हा शासनाचा महत्वाचा विभाग असून शासकीय प्रक्रीयेमध्ये या विभागाचा महत्वाचा वाटा आहे. काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताण तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे खेळण्याने हा सर्व ताण तणाव कमी होतो. या स्पर्धेमध्ये कोणताही जिल्हा  जिंकला तरी महसूल विभागच जिंकरणार असल्याने  सांघिक भावना ठेवून ही स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.


           विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा -2023 चे  उद्घाटन क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आले. ही क्रीडा स्पर्धा तीन दिवस सुरू राहणार आहेत.


          विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर म्हणाले  शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असल्याने सर्वांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपला छंद पूर्ण करावा. खेळामुळे शरीर निरोगी राहते त्यासोबत मनाला देखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते असेही विभागीय आयुक्त म्हणाले.


          प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, महसूल संघटनांनी या स्पर्धेचे खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेले आहे. शासनाच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणी महसूल विभागामार्फत होत असल्याने विकासात विभागाचे महत्व अनन्य साधारण आहे. एकवीसव्या शतकात माहिती तंत्रज्ञानामुळे स्मार्ट वर्क करणे सोपे झाले आहे. आज महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी अद्ययावत होत आहेत. काम करण्याबरोबरच अधिकारी आणि कर्मचारी खेळात देखील प्राविण्य मिळवित आहेत. त्यामुळे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा सर्वांमध्ये नवीन उत्साह निर्माण करणार आहेत. अशा प्रकारच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमुळे विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येतात त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.          मार्च पास मध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद, व्दितीय नांदेड आणि तृतीय क्रमांकावर परभणी जिल्ह्याने पटकाविला. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल सुर्यवंशी यांचा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी औरंगाबाद महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रकाशित दिनदर्शिका आणि डायरीचे विमोचन देखील करण्यात आले.


          यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बीड जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड, परभणी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, लातुर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उस्मानाबाद जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपायुक्त पराग सोमण, जगदिश मिनीयार, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे आदी  उपस्थित हेाते.


 No comments:

Post a Comment

Pages