दलित पँथरची स्थापना जरी १९७२ ची असली तरी आम्हच्या किनवटला पोंहचली ती १९७४ साली.शहरातील हनुमान मंदिराला लागुनच आम्हची गल्ली आहे.जी पुर्वी "ईनकर गल्ली",म्हणून ओळखल्या जायायची गावातील सर्वजन आम्हाला "ईनकरोलू",म्हणायचे.नंतरच्या काळात भीमजयंती आम्हच्या गल्लीत साजरी करण्यात येऊ लागली.त्यानंतर मात्र आम्हची गल्ली "बौद्ध वाडा", म्हणून ओळखल्या जाऊ लागली.किनवटला रेल्वे कर्मचारी असलेले बळखंडे हे रेल्वे कर्मचाऱ्यांना एकत्र करून भीमजयंती साजरी करत असत.यामुळे त्यांच्या प्ररणेने आम्हच्या गल्लीत ही छोट्या प्रमाणात का होईना भीम जयंती साजरी होऊ लागली.माझ्या आठवणीप्रमाणे तो काळही १९७० नंतरचाच.त्या काळात आम्हच्या वार्डाचे नगरसेवक होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पुंडलिक कावळे त्यांना मेंबर कुंडलिक म्हणूनच सर्व जन ओळखायचे.दुसरे एक कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते गंगाराम दगडू भरणे.त्यानंतर पुंडलिक कावळे यांचे छोटे भाऊ वामन कावळे हे ही सुरवातीच्या काळात कार्यकर्ते च होते.त्यांच्या पुढाकाराने गल्लीत भीमजयंतीची सुरुवात झाली.
१९७४ - ७५ साली बळीराम पाटील महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पी.एस.धन्वे हे रुजु झाले.ते आम्हच्या गल्लीत च राहायला आले.त्यांनी नियोजित बुद्ध विहाराजवळील रामा कावळे यांची रुम भाड्याने घेतली.त्यांच्या आधी पोस्ट ऑफिस मध्ये असलेले पी.जी.गायकवाड हे कर्मचारी आम्हच्या गल्लीत माझ्या घरा समोरच्या रामा कावळे यांच्या रूम मध्ये किरायाने राहायला आले.त्यांच्या सोबत त्यांचा लहान भाऊ सुरेश गायकवाड हे ही रहात असत. धन्वे व गायकवाड हे आम्हच्या गल्लीत रहायला आल्यापासून आमच्या गल्लीचे वातावरण पार बदलून गेले.आमच्या गल्लीत महाराष्ट्रातील दलितांची परिस्थिती व भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या कार्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली.मी ४थी, ५ वीत असूनही मला ब-या पैकी समज असल्याने मी या चर्चा अगदी मन लावून ऐकत असे.
याच काळात एक घटना घडली,पुढे चालून ती पँथर स्थापनेचे निमित्त ठरली.कॉस्मापॉलिटन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे.कांबळे यांना संस्था पदाधिका-यांनी कामावरुन कमी केले होते.त्यांना कामावर घ्यावे म्हणून त्या वेळी दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड व रामराव भरणे यांनी उपोषण केले होते.परिस्थिती वाईटच होती.येणाऱ्या काळात दलितावरील अन्याय,अत्याचाराला तोंड देण्यासाठी प्रा.धन्वे यांनी 'दलित पँथर', ची स्थापना करण्यास सांगीतले.त्यांच्याच मार्गदर्शना खाली नियोजित बुद्ध विहाराच्या जागेवर रात्री एक बैठक झाली व त्यात "दलित पँथर",ची स्थापना करण्यात आली. या बैठकीला मोजकेच पण अत्यंत निष्ठावान व जिवाला जिव देणारे कार्यकर्ते उपस्थित होते.हे वर्षे होते १९७६ चे.
अध्यक्ष म्हणून दादाराव कयापाक व सचिन म्हणून सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड झाली. या बैठकीस माझ्या आठवणी प्रमाणे कॉस्मापॉलिटन विद्यालयाचे कर्मचारी डी.टी.कदम,दादाराव कयापाक, सुरेश गायकवाड, सुखदेव मुनेश्वर, मनोहर भगत,जी.एस.रायबोळे, रामराव भरणे,माधव कावळे,यादव नगारे, नितिन कावळे,रघुनाथ कावळे,लक्ष्मण कांबळे, प्रकाश नगराळे, मी(मिलिंद सर्पे),माझे बाल मित्र प्रकाश पाटील व कहीजण होतो.
१९७६ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी जाहीर केली. यानंतर दलित पँथरचे तत्कालीन नेते राजा ढाले यांनी पँथर बरखास्त केल्याचे जाहीर केले व 'मास मुव्हमेंट', या संघटनेची स्थापना केली.याच काळात आम्हच्या तालुका नेतृत्वानेही कोठारी(चि.)येथे मास मुव्हमेंट ची पहीली शाखा काढली व तिचे अध्यक्षपद हरिप्रसाद सर्पे यांना दिले.परंतु,नंतरच्या कांही घडामोडीनंतर आम्ही एस.एम.प्रधान,गंगाधर गाडे व प्रा.अरुण कांबळे यांच्या दलित पँथर मध्ये च काम करू लागलो.१९७८ मध्ये सुरेश गायकवाड हे बळीराम पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचे सचिव म्हणून बिनविरोध निवडून आले होते,तर दुसऱ्या वर्षी ते विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष झाले.यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे दलित पँथर मध्ये सहभागी झाले होते.
पुढेचालून २७ जुलै १९७८ साली नामांतराचा ठराव विधिमंडळात पारित झाला.परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही.नामांतराच्या सर्वच लढाईत किनवट तालुका दलित पँथर अग्रभागी होती. याबरोबरच तालुक्यातील दलितांचे रक्षण करण्यातही पँथर अग्रभागी होती.या काळातील एक खंत आम्हाला नेहमीच सतावते ती म्हणजे आम्हचे मार्गदर्शक प्रा.पी.एस.धन्वे यांना ऐन नामांतर विरोधी चळवळीत संस्थेने त्यांना फुले - आंबेडकरी चळवळीचा विचारवंत आहे म्हणून कामावरून कमी केले.आम्ही पॅंथरनी त्यांना कामावर घेण्यात यावे, यासाठी आंदोलन केले.परंतु,त्यात आम्हाला यश आले नाही.पण म्हणतात ना जे काही होते ते चांगल्यासाठीच होते.प्रा.धन्वे हे एल.एल.बी.करून होते.त्यांनी किनवटला वकिली सुरू केली.त्यांना चांगलेच यश आले.पुढे चालून ते वकिली व्यवसाय करण्यासाठी नांदेडला गेलेत तेथेही त्यांना अपार यश आले.नंतर ते औरंगाबादला गेलेत तेथेही त्यांनी व्यवसायात चांगलाच जम बसविला.पुढे चालून ते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारिपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झालेत,तर निलम गोऱ्हे या प्रदेश सरचिटणीस झाल्यात या दोघांनी त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला होता.
त्याकाळाती ऐक-ऐक घटना सांगितल्या तर त्याचा एक प्रेरणादायी इतिहास होईल. कोणत्याही चळवळीला चढ -उतार असतातच.आम्हचे काम हे चळवळीच्या चढावरील काम होते.कोणत्याही चळवळीचा पाया रचणे फारच अवघड असते.परंतु, त्यावर ईमारत बांधणे सोपे असते.आम्हाला अभिमान व गर्व आहे की, फुले -आंबेडकरी चळवळीच्या पायाचे दगड म्हणून आम्ही काम केले व आजही जमेल तसे व जमेल त्या पध्दतीने काम करीत आहोत.नामांतराचा लढा हा आम्हच्या साठी स्वाभिमान शिकवणारा होता.आता कार्यकर्ते तयार होतांना दिसत नाहीत. दिड दमडिच्या लोभापायी समाजाला विकणारे कार्यकर्ते गावोगावी तयार झाले आहेत,ही आम्हची खंत आहे,तेही नामांतर दिनानिमित्त... यावर येत्या काळात काही विचार होईल काय?....
- अॕड.मिलिंद सर्पे
No comments:
Post a Comment