जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला
कापले गेलो तरी, तोडले नाही तुला
ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना...
कविवर्य सुरेश भट यांच्या ह्या ओळी वाचल्या की अंगावर शहारा येतो कारण ह्या ओळी काही काल्पनिक कहाणी वरील नाही तर वास्तवाचं चित्रण करणाऱ्या आहेत आणि हे वास्तव म्हणजे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी उभा राहिलेल्या संघर्षाचं...
27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र विधान भवनाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाच नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ केल्याचे ठराव पारित करण्यात आले. परंतु विद्यापीठाला नाव मिळाले
ते 14 जानेवारी 1994 ला.
17 वर्ष हा नामांतराचा प्रश्न तत्कालीन सत्तेने पुढं रेटत ठेवला होता.तब्बल सतरा वर्षानंतर आपल्या भारत देशाचा घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर याचं नाव देण्यासाठी झगडावं लागलं.कित्येक अन्याय,अत्याचारांना सामोरे जावं लागलं तेव्हा कुठे विद्यापीठाचे नामांतर ऐवजी नामविस्तार झाला.पण या लढाईत अनेक आंबेडकरवादी शहीद झाले बघूया त्या शहिदांची कहाणी...
आज विद्यापीठामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला बाबासाहेबांचा मोठा पुतळा आपल्याला दिसतो आणि या वाघिणीचे दूध म्हणून संबोधलेल्या शिक्षणाला प्राशन करायला या विद्याकेंद्रामध्ये जा असा इशारा बाबासाहेब करतायेत असं चित्र भासतं. आणि जसे आपण विद्यापीठाच्या दिशेने जातो तसंच एक शहीद स्तंभ आपल्या डोळ्यासमोर येतो.
हो हा तोच शहिद स्तंभ आहे ज्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतः चा प्राण गमवला.त्या सर्व शहिदांच्या आठवणीत बनवलेला हा स्तंभ आहे.
हा पोचिराम कांबळे असा सवाल जेव्हा इतिहासाला विचारला जाईल तेव्हा 'काळजाच्या आतून जयभीम चा निनाद करत इतिहासाला बोलावं लागेल.
तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे राहणारा ऐन उमेदीत आलेला हा तरुण.नामांतर चळवळीने आता संपूर्ण मराठवाडा शहारला होता हर गावखेड्यात काहींना काही घडत होतं. ही जातिवादाची आग आता नायगावात येऊन ठेपली होती. हा पोचिराम मातंग कुटुंबात जन्माला आलेला आज गावात बाबासाहेबांची जयंती काढतो.मातंग,महार एकीकरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र जातीवाद त्याला आडवा जातो कारण हर एका समाजाने एक एक महापुरुष वाटून घेतलेत त्याने त्याने आपापल्या महापुरुषांची जयंती साजरी करावी असा निर्णय ह्या व्यवस्थेने दिला आहे. अन हीच चाकोरी आता पोचिराम मोडत होता. बाबासाहेब काही एका समाजाचे नाही तर देशाचे आहे असं ठामपणे सांगत होता मग काय एव्हढच काफी आहे की मरणाच्या दारात उभं राहायला.
गावगुंड खवळले होतेच याच्यावरती अख्खी मातंग वस्ती आता त्यांची दुष्मन झाली होती अखेर एक दिवस गाठला त्याला आणि जय भीम म्हणतो काय असा सवाल करत मारत सुटले अखेर त्याचे हात पाय तोडून जळत्या आगीत फेकून दिले.तरीही हा पोचिराम अखेरच्या श्वासापर्यंत जय भीम ची गर्जना करत करत शहीद झाला...
हे अन्याय अत्याचार काही थांबत नव्हते चहू दिशा आता गर्जत होत्या अशातच पुन्हा एक नाव समोर आलं तेही नांदेड जिल्ह्यातीलच आहे दलित पँथर चे नांदेड जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे यांचं.
विद्यापीठाचे नामांतर करा असे 20 नोव्हेंबर 1993 रोजी गौतम वाघमारे यांनी मुख्यमंत्र्याला पत्र लिहून स्वतःच्या आत्मदहनाचा ईशारा दिला.
पुढील पाच दिवसातच म्हणजे 25 नोव्हेंबर 1993 ला या या वाघाने आत्मदहन केलं.
किती ही आत्मीयता आहे ना एक फक्त एक नाव विद्यापीठाला द्या ही मागणी होती आणि या मागणीची पूर्तता होत नाही म्हणून आपला प्राण देऊन टाकायचा हे एव्हढ सोपं नाही. हे बलिदान समजून घ्यायचं असेल तर लोककवी नामदेव ढसाळ यांची ही कविता खूप काही सांगते.
बा भीमा !
हे सर्व तुझंच आहे
हे जगणं आणि मरणं
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि वास्तव
भूक आणि तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे
तू बसला आहेस अंतकरणात अंकुरुन...
अन अशा प्रकारे गौतम वाघमारे ही शहीद झाला.
अशी कितीतरी नावे आज आपल्याला घेता येतील ज्याची कहाणी ऐकून डोळ्यात आसवं दाटून येतील सुहासिनी बनसोडे,चंदर कांबळे तसेच नामांतराच्या ह्या लढ्यावरती पोवाडा लिहिणारे शाहीर विलास घोगरे.
विधान भवनात धूर्त राजकारण्यांनी सुरू केलेला खेळ अखेर 17 वर्षांनंतर जनतेच्या न्यायालयात जिंकला
ज्यांच्या बलिदानातून बाबासाहेब आंबेडकर हे नाव औरंगाबादच्या भूमीवर कोरलं गेलं आहे. त्यांच्या नावाने इतिहासाची पाने आज अजरामर झाली आहेत.
ही नावं आज प्रेरणास्त्रोत बनून यापुढील कित्येक पिढ्यांना शिकण्याबरोबर चळवळीच्या लढाया लढण्याचं बळ देत आहे आणि देत राहील यात तिळमात्र शंका नाही...
- अशोक बनकर
No comments:
Post a Comment