संगीत नाटक अकादमी चा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा’ पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील 11 कलाकारांना सन्मानित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 February 2023

संगीत नाटक अकादमी चा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा’ पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील 11 कलाकारांना सन्मानित

नवी दिल्ली  : प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी चा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’  केंद्रीय  सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि  संगीत वाद्य निर्माता यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात वर्ष 2019, 2020 आणि 2021 चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील एकूण 11 कलाकारांना याप्रंसगी सन्मानित करण्यात आले.

        येथील मेघदूत सभागृहात 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत “अृमत युवा कलोत्सव 2022-23” सुरू आहे. यादरम्यान बुधवारी सायंकाळी ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’  प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, उपाध्यक्ष जोरावरसिंग जाधव, सचिव अनेश राजन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी तीन वर्षांसाठी एकूण 102 युवा कलाकारांना  पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

वर्ष 2019 साठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे  यांना सन्मानित करण्यात आले.  वर्ष 2020 साठी तबला वाद्य बनविणारे किशोर व्हटकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संगीत वाद्य बनविण्याची श्रेणी नव्याने सुरू करण्यात आली असून श्री व्हटकर या श्रेणीतील पुरस्कार स्वीकारणारे प्रथमआहेत. वर्ष  2020 साठी हर्ष नारायण यांना सारंगी वादनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.  शाकीर खान यांना हिदुस्थानी वाद्य संगीत स‍तार वादनासाठी सन्मानित करण्यात आले. एल. राम कृष्णन यांना कर्नाटक वाद्य संगीत (वायलिन) वादनात उल्लेखनिय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. स्वप्नकल्पा दास गुप्ता यांना ओडिसा नृत्यातील त्यांच्या योगदासाठी गौरविण्यात आले. पवित्र कृष्ण भट्ट यांना भरतनाट्यम नृत्यातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2021 साठी तमाशा या श्रेणीत सुप्रसिद्ध तमाशा कलाकार वैशाली जाधव यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. पंढरपूरात जन्मलेले ज्ञानेश्वर देशमुख यांना पखवाज वादनाच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईत जन्मलेले अहसान अली यांना नृत्यासाठी संगीत श्रेणीतील त्यांच्या योगदानासाठी गौरविण्यात आले.  मुंबईत जन्मलेले सुनील सुनकारा यांना कथक नृत्यातील समग्र योगदासाठी वर्ष 2021  च्या युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. संग्राम भंडारे यांना वारकारी कीर्तन या श्रेणीतील युवा पुरस्कार  जाहीर झाला होता. मात्र ते पुरस्कार सोहळयात उपस्थित होऊ शकले नाहीत.

मूळच्या महाराष्ट्रातील वर्धेच्या गौरी देवल यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी या सध्या दिल्लीत स्थायिक असून  नाटय क्षेत्रातील एक सुपरिचित व्यक्तीमत्व आहेत.

उस्ताद बिसमिल्ला खान युवा पुरस्कार संगीत, नृत्य, नाटक, पांरपारिक (लोकसंगीत/आदिवासी/ नृत्य/संगीत/नाटक/ बोलक्या बाहुल्या) या श्रेणीतील युवा कलाकारांना कलेच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. यासह परफॉर्मिंग आर्ट्स सादर करणाऱ्यांना ‘उत्साद बिसमिल्ला ख़ाँ युवा’  पुरस्कारातंर्गत  शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.  पुरस्कार प्राप्तीचे वय 40 वर्षापर्यंतचे आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.



No comments:

Post a Comment

Pages