भीमयोद्धा पत्रकार म्हणजे बबन कांबळे ...! - यशवंत मनोहर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 February 2023

भीमयोद्धा पत्रकार म्हणजे बबन कांबळे ...! - यशवंत मनोहर

नागपूर :

८ फेब्रुवारी २०२३ रोजी बबन कांबळे नावाचा पत्रसम्राट काळाच्या पडद्याआड गेला. पण या काळाच्या पडद्यालाही सम्राट हा अभंग पत्रपराक्रम झाकता येणं शक्य नाही. 

       दैनिक ' नवा काळ ' च्या पत्रशाळेत बबन कांबळे यांचा पत्रकारजन्म झाला आणि दै.       ' पुण्यनगरी ' त त्यांच्यातील साहस ऊर्जावंत झालं. अशा अनुभवाचं पाथेय आणि सदिच्छांचं कणखरपण  घेऊन बबन कांबळेंनी दैनिक सम्राटचा 

प्रबोधनप्रयोग सुरू केला. या धाडसी निर्णयालाच लोक आता बबन कांबळे म्हणतात. 

       बबन कांबळेंजवळ जिद्दीच्या  आणि समाजाच्या सदिच्छांच्या गडगंज भांडवलाशिवाय काहीही नव्हतं. पंखही नव्हते आणि उडायला गगनही नव्हतं. पण बबन कांबळेंच्या दुर्मीळ निर्धारानं 

एकाच वेळी पंखही निर्माण केले आणि गगनही निर्माण केलं. 

        हा वाळवंटाचं हिरवळीत पुनर्वसन करण्याचाच ध्यास होता. 

बबन कांबळेंचा हा प्रयोग मूलतः  अग्निप्रयोगच होता.यासाठीच बबन कांबळेंना आपण सम्राट बबन कांबळे म्हणायला हवं. बबन कांबळे हे पोलादी व्यक्तिमत्त्वाचेच पत्रकार होते. ते

त्यामुळेच अपराजितही होते.      सम्राट या दैनिकाला सर्वच सर्वहारांचे पूर्णवेळ दैनिक ही प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. 

      सम्राट म्हणजे सर्वच सर्वहारांच्या अडचणींचा, त्यांच्या 

दु:खदैन्याचा, त्यांच्यावर होणा-या

अन्यायअत्याचारांचा आणि त्यांच्या आंदोलनांचा अजोड आवाज होता. हा सर्वसमावेशक 

आवाज कधी वाकला नाही. त्यामुळे सम्राट हे दैनिक आंबेडकरक्रांतीचं मुखपत्र ठरलं. आणि बबन कांबळे हे या क्रांतिपत्राचे झुंजार नायक ठरले.

      बबन कांबळेंचं हे कार्य निर्दय 

वादळातही न विझणारा दिवा लावण्यासारखं किंवा हट्टी अंधारात आंबेडकर नावाचा अजिंक्य सूर्य प्रस्थापित करण्यासारखंच होतं. बबन कांबळेंनी अडचणींच्या पाय-या

ओलांडत प्रवास केला आणि सम्राटला पूर्ण भीममय केलं. 

हा बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्यवादी पत्रकारितेचाच लखलखता वारसा होता. बबन 

कांबळे नावाचा हा भीमयोद्धा पत्रकार काळापुढं न वाकता काळाला वाकवित जगला. हे त्यांचं जगणं काळावर मात करणारंच पराक्रमी जगणं आहे. 

      बबन कांबळे ही गोष्ट एका जिद्दीची अनोखी गोष्ट निर्माण करण्याचीच गोष्ट आहे किंवा ही

गोष्ट वर्तमान दुखण्यावरचं भीमसूर्य नावाचं विजयी औषध घरोघरी पोचवणा-या निष्ठावंत वा-याचीच गोष्ट आहे. ही गोष्ट वाचणारांना ही गोष्ट एका संग्रामाचीच गोष्ट आहे असंच वाटत राहील. 

      काही मोठ्या सभांमध्ये त्यांच्यासोबत मला बोलता आलं. 

काही मूलगामी चर्चा करता आल्या. या सर्व आठवणी आता त्यांच्या सहीसोबत मनात सतत उगवत राहतील.

       बबन कांबळे नावाच्या  सम्राटच्या या शिल्पकाराला आणि त्यांच्या दुर्दम्य सम्राटपणाला विनम्र अभिवादन! 

              

           

                     

                   

No comments:

Post a Comment

Pages