मुंबई -
निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे. तर अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकाराची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. अशा भ्याड हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केली.
नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली होती.त्यानंतर एका पत्रकराचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.सोमवारी राजापूर येथे झालेल्या थार वाहन आणि दुचाकी अपघातात जखमी झालेले पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मात्र, या अपघातात आता वेगळी बाजू समोर येऊ लागली आहे. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे या पत्रकाराच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.
सोमवारी सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीसे यांनी सकाळी टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1.15 च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणार्या महिंद्रा थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र,मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष आहेत.
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो, हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
तरी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशीही मागणी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे, मंत्रालय संपर्क प्रमुख नितीन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, राकेश टोळये, राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, वृत्तवाहिणी संघाचे अध्यक्ष रणधिर कांबळे, मनिष केत, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, पश्चिम विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ प्रमुख निलेश सोमाणी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, नागपूर विदर्भ प्रमुख महेश पानसे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, अमरावती विभागीय अध्यक्ष नयन मोंढे, गोवा संपर्क प्रमुख शिवाजी नेहे, गुजरात संपर्क प्रमुख रमजान मन्सुरी, दिल्ली संपर्क प्रमुख सरला चौधरी, आदींसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकार्यांनी केली आहे.
या घटनेतील दोषींवर कारवाई करावी असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment