उच्च शिक्षणातील मुल्यमापन सुधारणा’वर मंथन होणार - कुलगुरु परिषदेचे आज उदघाटन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 February 2023

उच्च शिक्षणातील मुल्यमापन सुधारणा’वर मंथन होणार - कुलगुरु परिषदेचे आज उदघाटन

  औरंगाबाद दि.२० : ’असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज’ यांच्यावतीने २१ व २२ फेब्रुवारी दरम्यान ’पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद’ औरंगाबादेत होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला यजमानपद मिळाले असून चार राज्यातील ६० विद्यापीठांचे कुलगरु परिषदेस उपस्थित राहणार आहेत.


  या संदर्भात ’एआययु’ पदाधिकां-यासमवेत व्यवस्थापन परिषद कक्षात सोमवारी (दि.२०) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, ’एआययु’चे उपाध्यक्ष डॉ.जी.डी.शर्मा, महासचिव डॉ.पंकज मित्तल, नोडल ऑफीसर विजेंद्रकुमार, सत्यपाल, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.बीना सेंगर, संयोजक एस.जी.शिंदे आदींची उपस्थिती होती. ’असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज’ अर्थात ’एआययु’ने पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेचे यजमानपद आपल्या विद्यापीठाला दिले आहे. २१ व २२ फेब्रुवारी रोजी हॉटेल रामामध्ये ही परिषद होईल. या दोन दिवशीय परिषदेचे उदघाटन मा.अतुल कोठारी (सचिव, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास) यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२१) सकाळी १० वाजता होईल. समारोपास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील व प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच ’एआययु’चे सर्व पदाधिकारी व उच्च शिक्षण क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमास ’एआययु’चे अध्यक्ष प्रा.सुरंजन दास (कुलगुरु, जाधवपूर विद्यापीठ, कोलकत्ता), उपाध्यक्ष डॉ.जी.डी.शर्मा (कुलगुरु, युएसटीएम विद्यापीठ, मेघालय), महासचिव डॉ.पंकज मित्तल व संयोजक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसात सहा सत्रात या विषयावर चर्चा होणार आहेत. महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थानमधील ६० कुलगुरुंनी परिषदेस उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे, असेही मा.डॉ.प्रमोद येवले म्हणाले.


मराठवाडयासाठी गौरवाचा क्षण : मा.कुलगुरु


  जवळपास १५ वर्षानंतर परिचय विभागीय कुलगुरु परिषदेचे यजमानपद मिळाले ही आनंदाची बाब आहे. हा एका अर्थाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठवाडयाचा बहुमान आहे, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व कुलगुरु, पदाधिकारी विद्यापीठासही मंगळवारी दि.२१ दुपानंतर भेट देणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages