स्वतःतील ताकद ओळखून असं आयुष्य घडवा, ज्यामुळे समाजाचं भले होईल - यजुर्वेंद्र महाजन यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 February 2023

स्वतःतील ताकद ओळखून असं आयुष्य घडवा, ज्यामुळे समाजाचं भले होईल - यजुर्वेंद्र महाजन यांचे प्रतिपादन

कल्याण -

जीवनदीप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सत्कर्म परिवार बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्मृतीगंध कृतीशील काव्य ''मुक्त संवाद'' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.


या प्रसंगी त्यांनी सांगितले की, तरुणांमध्ये प्रचंड ताकद आहे. जीवनात प्रत्येक काम करायला गेल्यावर अडचण येणारच. जेवढी अडचण मोठी तेवढ काम मोठ, जेवढी अडचण छोटी तेवढ काम छोटे. त्यामुळे प्रचंड अडचणी येतात त्यांना घाबरू नका. अडचणी आपल्याला मजबूत करायला येत असतात. या अडचणींवर मात केल्यावर आपण अधिक मोठे काम करू शकतो. असा दृष्टीकोन समोर ठेवल्याने उलट अडचणींमुळे आम्ही पुढे आलो आहोत.


ते पुढे म्हणाले की, तरुणांमध्ये जबरदस्त ताकद आहे. ती वाया जाऊ देऊ नका, टाईमपास करू नका. स्वतःतील ताकद जाणून असे आयुष्य घडवा की ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल तुमच्या घरच्यांना अभिमान वाटेल आणि त्यात समाजाचे भलं होईल असेच काम करा. देशासाठी काहीतरी चांगल काम करता येईल असे करा.


त्यांनी आपल्या कार्याविषयी सांगितले की, मी कॉलेजला असताना असं मनात आलं होते की आयुष्यात असं काम करावे कि ज्यांना खरंच चांगल शिक्षण मिळत नाही त्यांना आपण दिले पाहिजे. अशी प्रेरणा मला स्वामी विवेकानंद व अनेक समाज सुधारकांकडून मिळाली. ग्रामीण आदिवासी भागात चांगले शिक्षण मिळत नाही ते शहरात येऊ शकत नाहीत म्हणून ते मागे पडतात म्हणून हे काम सुरु केले. पण नंतर समजलं की ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गरज ही दिव्यांगांना आहे. त्यांच्यापेक्षा जास्त गरज ही अनाथांना आहे. असं करत करत ही संस्था वाढत गेली आणि गेल्या १५ वर्षापासून हे कार्य मोठ्या पातळीवर सुरु आहे. यावेळी दिपस्तंभ कशा प्रकारे कार्य करते याचा व्हिडिओ प्रोजेक्टरवर दाखविण्यात आला.या वेळी सूत्रसंचलन प्रा. नरेश टेम्भे यांनी केले


याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, सत्कर्म परिवार संस्थापक संजय साळी, प्राचार्य डॉ.के.बी.कोरे, डॉ.शंकर मुंडे,  उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे तसेच निर्मल स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच परिसरातील शाळांमधून बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages