आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त मांडवी येथे कार्यशाळा ; किनवट तालुका कृषी कार्यालयाचा उपक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 February 2023

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त मांडवी येथे कार्यशाळा ; किनवट तालुका कृषी कार्यालयाचा उपक्रम

किनवट,  दि.13 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्संघाने 2023 वर्ष हे ङ्गआंतरराष्ट्रीय पौष्टिक  तृणधान्य वर्षफ म्हणून घोषित केले असून, सर्वत्र तृणधान्याचे  महत्व सांगणारे विविध कार्यक्रम कृषीविभागातर्फे घेण्यात येत आहेत. या  अनुषंगाने तालुक्यातील मांडवी येथे सध्या चालू असलेल्या यात्रा  महोत्सवामध्ये किनवट तालुका कृषी कार्यालयाकडून ता. कृ. अधिकारी बी. बी. मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि.08) कार्यशाळा घेण्यात आली. या पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे उद्घाटन मांडवीच्या सरपंच सुमनताई पेंदोर व तंटामुक्ती अध्यक्ष कुंदनसिंग पवार यांच्या हस्ते  करण्यात आले.                                         


      या कार्यशाळेत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्यांच्यातील औषधी व पौष्टिक गुणधर्माचे फायदे नागरिकांना पटवून देण्यासोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी यात्रेत आलेल्या शेतकर्‍यांसह उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. . दरम्यान अनेकांनी तृणधान्यांपासून बनविलेल्या विविध पदार्थांचा स्वादही घेतला. मार्गदर्शनामध्ये  ता.कृ.अधिकारी बी.बी.मुंडे, मंडळ कृषी अधिकारी बी.आर.मुनेश्वर यांचेसह पर्यवेक्षक जी.डी.भालेवाड, कृषी सहाय्यक एम.एल.ताडेवार, सी.डी.  सिंधू मेश्राम, संगीता वाडगुरे,एस.डी.शेवाळे, शिवा पाटील, मॅकलवार कानंदी, चिप्पावार व मोटारिया मॅडम, श्याम डोंगरे, आकाश प्रधान या सर्वांनी सहभाग घेतला होता.   त्याचा सार असा की, आधुनिक जीवनशैलीनुसार मानवाच्या दैनंदिन आहारात बदल झाला आहे. या बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणार्‍या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी प्रत्येकानेच या कार्यक्रमाचा भाग होवून पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे.  यात विषेश म्हणजे ज्वारी,बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा, यासारख्या पदार्थांचा समावेश  आहारामध्ये करून ते वाढविण्यासोबतच त्यापासून निरनिराळे पदार्थ कसे तयार करता येतील ही माहिती देण्यासाठी प्रशिक्षण व  पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ शहरी व ग्रामीण नागरिकांना चाखण्यासाठी मिळावे याकरिता फूड फेस्टिवल सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता स्थानिक डॉक्टर, शासकीय संस्था, आहार, योग व आयुर्वेदातील तज्ज्ञ व्यक्ती,  महिला बचत गट, तृणधान्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्या या सर्वांचा सहभाग घेतला जाणार असल्याचे सांगितले.


     यावेळी  तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी,  कृषी पर्यवेक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, उपसरपंच सरोज कार्तिक चव्हाण, नायब तहसीलदार  उद्धवजी बंपलवार, राहुलवार सर, अविनाश चव्हाण, प्रवीण श्रीमनवार, सुनील श्रीमनवार, चतुरंग कांबळे,  गणेश चव्हाण, संतोष बंडेवार, वैशपाल कांबळे, विश्वास कांबळे, दिलीप राठोड, सुरेश राठोड यांचेसह परिसरातील खेड्यापाड्यातून आलेले नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages