औरंगाबाद, दि.20, :- जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना विशेष ओळखपत्र देण्याबरोबरच कुटूंबातील महिला व मुलांची आरोग्य तपासणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बैठकीत दिली.
बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुंडलीकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.एन.केंद्रे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील कन्नड आणि वैजापूर तालुक्यातून ऊसतोड कामगार रोजगारासाठी स्थलांतर करतात. स्थलांतर केलेल्या ऊसतोड कामगारांच्या लहान मुलांच्या पालन पोषणाची व शिक्षणाची जबाबदारी गावातील नातेवाईक किंवा अन्य ठिकाणी केलेली असते. या मुलांच्या शिक्षणासाठी हंगामी वसतीगृहे, सुरक्षिततेबाबत पोलीस, आरोग्य, शिक्षण विभागाच्या समन्वयाने काम करुन मुलांना सुरक्षित वातावरण आणि पोषक आहार मिळवून देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच ऊसतोडीला गेलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. स्थलांतरीत झालेल्या जिल्ह्यात ऊसतोड कामगारांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करुन देण्याचा पाठपुरावा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना करावयास सांगितले. जिल्हामध्ये ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य आणि शिक्षणाबाबत केलेल्या कामकाजाची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.
No comments:
Post a Comment