किनवट,ता.१५ : मागील पाच वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या किनवट शहरासह कोठारी ते हिमायतनगर हा राष्ट्रीय महामार्ग तातडीने मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी विविध पक्ष व संघटनांना सोबत घेऊन लवकरच मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते उध्वराव रामतिर्थकर यांनी निवेदनाद्वारे सर्व संबंधितांना नुकताच दिला आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून कोठारी ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. कंत्राटदाराच्या निष्क्रिय कारभारामुळे जागोजागी काम अर्धवट अवस्थेत आहे. अर्धवट निकृष्ट रस्त्यामुळे अपघाताचे प्रसंग उदभवत आहेत, तर धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी निवेदने देऊनही फायदा होत नसल्याने नागरिक संतापले असून वाहनधारकासह शेतकऱ्यांना होणारा त्रास तसेच रस्त्याचा निकृष्ट दर्जा पाहता हे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी येथील सर्वपक्षीय नेते,सामाजिक संघटनेचे नेते, पत्रकार, वकील, नागरिक यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल,असे रामतिर्थकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.अधिकारी व कंत्राटदाराच्या मनमानीमुळे नागरिकांना घोरयातना भोगाव्या लागत आहेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment