जातीच्या प्रमाणपत्रासाठी पाच दिवसापासून बेमुदत धरणे ‘सत्याग्रह’ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 March 2023

जातीच्या प्रमाणपत्रासाठी पाच दिवसापासून बेमुदत धरणे ‘सत्याग्रह’

किनवट, दि.13 (प्रतिनिधी) : आदिवासी कोळी महादेव जमातीच्या नागरिकांना पक्षपातीपणा न करता जात प्रमाणपत्रासह आरक्षणाचे संपूर्ण लाभ मिळावेत, या मागणीसाठी गत पाच दिवसापासून जमातीच्या अनेक महिला व पुरुषांनी आदिवासी कोळी कर्मचारी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केलेला आहे. मात्र, प्रशासकीयस्तरावरून अजूनही याची कुठलीच दखल घेतल्या गेलेली नाही, असे सांगण्यात आले.


        केंद्र शासनाने अनुसूचित जमाती म्हणून 1976 ला अनुसूची रद्द करून निर्देशित केलेल्या कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र देण्यापासून वंचित करण्यात आलेले आहे. त्यामुळे किनवट व माहूर तालुक्यातील कोळी महादेव जमातीच्या सुमारे 90 टक्के पात्र लोकांना आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळालेला नाही. तसेच या जमातीच्या लोकांचा शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक व राजकीय दृष्ट्या कुठलाही विकास झालेला नसून, बहुसंख्य लोक दारिद्—यात जीवन कंठीत आहेत.


    प्रशासकीय स्तरावर जातीचे प्रमाणपत्रासंदर्भात  2003 मधील  तरतूदींचे निकष अन्य जमातीसाठी वेगळे व कोळी महादेव जमातीसाठी जाणीवपूर्वक वेगळे लावण्यात येतात, असा आरोप गोणारे यांनी केलेला आहे. राज्य शासनाने मार्च 2023 अखेर अनुसूचित जमातीच्या सर्व लोकांना जातीचे प्रमाणपत्र देण्याविषयी सर्व उपविभागीय अधिकार्‍यांना आदेशित केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणी मात्र प्रशासकीयस्तरावरून केल्या जात नसल्याचा आरोप सत्याग्रह करणार्‍यांचा आहे. शासनाच्या  निर्देशाप्रमाणे  जातीच्या प्रमाणपत्रासाठी शेकडो संचिका प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या असून, त्यावर कुठलीही सकारात्मक कार्यवाही  अजून झालेली नसल्यामुळे, प्रशासनासोबतच शासनकर्त्यांविरुद्ध जमातीच्या लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाल्याचे म्हटले आहे. सत्याग्रहस्थळी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोणारे रामचंद्र बोईनवाड, नारायण दंतलवार, मारोती तोटेवाड, रामराव जमादार, संदीप जीनेवाडे, गजानन सोमेवाड, सुनंदा तिगलवाड, प्रल्हाद आलेवाड, नामदेव चटलेवाड, ज्ञानेश्वर गडमवाड, कविता यमलवाड, शोभा बैनवाड, देवकाबाई दोषणवाड, अरुणा सोमेवाड, अनसूया गोपणवाड, राधाबाई मामिलवाड, पद्मिनबाई तरटवाड, सुशिलाबाई थालेवाड, सुनिल मारपेवाड, रवी तेगेवाडसह  बहुसंख्येने जमातीच्या नागरिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages