बोधडी वनविभागाने चिखलीतांडा येथे वनजमिनीवर झालेले अतिक्रमण काढले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 April 2023

बोधडी वनविभागाने चिखलीतांडा येथे वनजमिनीवर झालेले अतिक्रमण काढले

किनवट  (प्रतिनिधी) :  तालुक्यातील बोधडी वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील चिखली तांडा परिसरात सुमारे अकरा हेक्टर वनजमिनीवर झालेले अतिक्रमण हटविले असून, नियतक्षेत्र भुलजा व पार्डी खुर्द भागातील अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती बोधडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी दिली.


       बोधडी वनविभागाकडून दरवर्षीच वनजमिनीवर अवैधरित्या झालेले अतिक्रमण काढून टाकल्या जात असते. अतिक्रमणाच्या नावाखाली चार ते सहा हेक्टर(दहा ते पंधरा एकर) वनजमीन अतिक्रमणधारकांनी गैरकायदेशीरपणे ताब्यात घेतली होती. पाच एकर वनजमिनीचा पट्टा त्यांचे नावे झाल्यानंतरही धुर्‍याला लागून असलेल्या वनजमिनीवर अतिक्रमणधारकांनी पाय पसरविणे सुरू ठेवले होते. हा प्रकार वनविभागाच्या लक्षात आल्यानंतर बुधवार ते शुक्रवारच्या दरम्यान  उपवनसंरक्षक केशव वाभळे, सहायक वनसंरक्षक लखमावाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव, वनपाल केशव बर्लेवाड यांनी डी. एन. गडे, काळे, देवकांबळे, अर्चना देशमुखे, देवापुरे, वनमजूर मोहन पवार आणि इतर वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उपरोल्लेखित अवैधरित्या बळकाविलेली वनजमीन जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणमुक्त करून ताब्यात घेतली.  तसेच पुन्हा पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी संरक्षणचर खोदकाम करून त्या कडेला वृक्षारोपणाची तयारी चालू केल्याची माहिती वनविभागाने दिली. शिवाय वनविभाग काही ठिकाणी तार कुंपण तर काही जागी चर खोदून वनहद्द कायम करीत आहेत. गेल्या दोन तीन वर्षात शेकडो एकर वनजमीन अतिक्रमणमुक्त करून वनविभागाच्या ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages