डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना औरंगाबाद (सध्याचे छ.संभाजीनगर) शहराबद्दल विशेष आपुलकी होती.बाबासाहेबांनी मुंबई नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे दुसरे काॅलेज सुरू केले ते औरंगाबाद शहरात.या काॅलेजच्या इमारतीचे संपूर्ण बांधकाम त्यांच्या देखरेखीखाली झाले.या काॅलेजच्या निमित्ताने १९५० पासून इतर महत्त्वाच्या कामातून वेळ काढून ते औरंगाबादला येत असत.
आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस औरंगाबाद शहरातच घालवावे असे एक रम्य स्वप्न बाबासाहेबांनी पाहिले होते.यासाठी त्यांनी ५ एकर २८ गुंठे जमीन (सर्व्हे क्र.२,जयसिंगपुरा) नागसेन वनात आपल्या नावे खरेदी केली होती.ही जमीन त्यांची व्यक्तिगत प्राॅपर्टी होती.सध्या विद्यापीठ गेटसमोर असलेल्या या जागेत पी.ई. सोसायटीच्या प्राध्यापकांचे क्वार्टर्स आहेत.या जागेत स्वतःला राहाण्यासाठी एक छोटासा टुमदार बंगला बांधावा अशी बाबासाहेबांची आकांक्षा होती.या बंगल्याजवळच एक अनाथ मुलांचा आश्रम सुरू करावा अशी त्यांची योजना होती.या अनाथाश्रमात कमीतकमी शंभर मुले तरी सांभाळता यावीत अशी व्यवस्था त्यांना करायची होती.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे " अनाथ,गरीब आणि परित्यक्ता किंवा कुमारी मातांनी टाकलेली मुले मी सांभाळावीत,त्यांना आंघोळ घालावी,त्यांचा शेंबूड काढावा आणि त्यांचे सर्वकांही करावे." असे बाबासाहेबांचे मातृह्रदय अनाथ व पोरक्या मुलांसाठी पाझरत होते.ते म्हणत, " आतापर्यंत मी माझ्या अंग मेहनतीने जी काय मालमत्ता मिळविली असेल तिचा विनियोग मला या अनाथाश्रमासाठीच करावयाचा आहे.माझा मुलगा चि.यशवंत व पुतण्या चि.मुकुंद यांच्यासाठी खारला मुंबईत दोन स्वतंत्र घरे बांधून दिलेली आहेत.स्वतःच्या उपजिविकेसाठी स्वतःच मिळविणे हे त्यांचे कर्तव्य आहे व ते त्यांनी करावे.माझी पत्नी हिच्यासाठी दरमहा २०० रूपयाची माझ्या पश्चात व्यवस्था केली तर पुरेसे आहे.बाकीची राहिलेली सर्व इस्टेट मी अनाथाश्रमासाठीच उपयोगात आणणार आहे.गेली ३०-४० वर्षाच्या दगदगीमुळे माझ्या मनावर आणि शरीरावर अत्यंत ताण पडलेला आहे.आता यापुढे मात्र मला असे कष्टाचे काम झेपणार नाही.म्हणून मी अनाथ अशा मुलांच्या मध्येच माझे शेवटचे उर्वरित आयुष्य मला खर्च करायचे आहे.येथे राहूनच मला येथील काॅलेज व हायस्कूल यांच्यावर लक्ष ठेवता येईल."
बाबासाहेबानी खरेदी केलेल्या याच जागेत एक भव्य लायब्ररी सुरू करायची त्यांची योजना होती.ही लायब्ररी सर्वांगीण दृष्टीने सुसज्ज असेल,असे त्यांचे स्वप्न होते.ते म्हणत, " ज्ञान संपादन करणे हे मानवी जीवनातील आद्य कर्तव्य आहे.माझ्या या लायब्ररी मुळे विद्यार्थ्यांना ज्ञान करण्याच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही.म्हणून ही लायब्ररी सर्व विषयाच्या विपूल ग्रंथानी मी परिपूर्ण बनविणार आहे."
(संदर्भ : डाॅ.आंबेडकरांचा सांगाती -बळवंतराव वराळे)
अशा प्रकारच्या कितीतरी योजना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी आखल्या होत्या.
दुर्देवाने त्यांच्या महापरिनिर्वाणामुळे या योजना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाही.
औरंगाबाद येथे खरेदी केलेल्या जागेचे पुढे काय झाले?अर्थातच वारसा हक्काने त्या जागेची मालकी माईसाहेबांकडे गेली.परंतु माईसाहेब कांही तेथे राहाणार नव्हत्या म्हणून त्यांनी ती जागा लीलाबाई बाभुळे नावाच्या महिलेस विकली.ही जागा पी.ई. सोसायटीच्या परिसराला लागूनच असल्या मुळे ती जमीन माईसाहेबानी पी.ई.एस. लाच विकावी अशी विनंती पी.ई.एस.च्या कार्यकारी मंडळाने त्यांना केली होती पण माईसाहेबांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
(कदाचित पी.ई.एस.ने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांना कार्यकारी मंडळात न घेतल्याचा राग त्यांच्या मनात असेल.) असो,पुढे ही जागा लीलाबाई बाभुळे यांच्याकडून प्राचार्य मच्छिंद्र वाहूळ यांच्या पुढाकाराने पी.ई.एस.ने खरेदी केली.
- संकलन : बी.एन.साळवे
No comments:
Post a Comment