इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीबद्दल समाधान सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा दिल्ली दौरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 6 April 2023

इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीबद्दल समाधान सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा दिल्ली दौरा

नवी दिल्ली, 06 : मुंबई येथील इंदू मिल याठीकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे या पुतळयाच्या प्रतिकृतीचा पाहणी  दौरा आज आयोजित करण्यात आला.


           मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांच्या सुचनेनुसार आज समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटूंबातील सदस्य, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचा  गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी  येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळयाच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.


यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच, काही किरकोळ बदल सुचविले. इंदू मिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असा राज्य शासनाचा मानस आहे.   इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  भव्य स्मारक उभारण्यास राज्यशासन कटीबध्द असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट आहे.


          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा  उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी श्री सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळयाबद्दलचे  सादरीकरण केले.


         सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, विधानसभा सदस्य संजय बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदिप कवाडे, भदंत राहूल बोधी यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी येथे आयोजित बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीविषयी समाधान व्यक्त केले.


देश- विदेशातील बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळयापासून प्रेरणा घेतील, अशा भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

Pages