मुंबई, दि. 13 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील महत्त्वपूर्ण घटनांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील हे प्रदर्शन आठवडाभर सुरु राहणार असून या प्रदर्शनास मंत्रालयातील कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, भास्कर बनसोडे, सुभाष गवई, विजय नांदेकर, सी.आर. निखारे, सविता शिंदे, मंगल नाकवा, सुदिन गायकवाड, अंबादास चंदनशिवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनातील छायाचित्रांचे संकलन नितीन पवार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment