किनवट,दि.22(प्रतिनिधी) : किनवट पालिकेसाठी निवडून येणाऱ्या सदस्यांची सुधारीत संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती,जमाती आणि नागरिकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार किनवट पालिकेमध्ये सदस्य संख्या एकूण 21 राहणार असून, त्यात अनु.जातीचे एकूण तीन पैकी दोन महिलासांठी राखीव, अनु.जमातीसाठी एक व ओबीसीसाठी (नामाप्र) एकूण पाच पैकी तीन महिलांसाठी राखीव असणार आहेत. तसेच उर्वरीत 12 सदस्यांच्या जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी असून त्यात सहा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन औरंगाबाद यांचेकडून दि.19 एप्रिल 2023 च्या शुद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
सन् 2011 च्या जनगणनेनुसार किनवट शहराची लोकसंख्या 28 हजार 454 असून, 3 हजार 590 नागरीक अनु.जातीचे तर 1 हजार 844 नागरीक हे अनु.जमातीचे आहेत. या आधारेच किनवट पालिकेची निर्धारित सदस्यसंख्या 18 होती. कोविड-१९ च्या प्रार्दुभावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष त्यावेळेस अप्राप्त असल्यामुळे, त्या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरून अधिनियमात नमूद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार किनवट नगरसेवकांच्या संख्येत आणखी 3 सदस्यांची वाढ होऊन ती 21 होणार आहे.
अधिसूचना क्र.2022/नपाप्र/निवडणूक/कावि-812 दि.04 जुलै 2022 नुसार किनवट पालिकेसाठी निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या 21 अशी निश्चित करून, त्यात अराखीव (खुला प्रवर्ग) साठी एकूण 17 पैकी 09 महिलांसाठी राखीव आणि अनु.जातीसाठी एकूण 3 पैकी 2 महिलांसाठी राखीव आणि अनु.जमातीसाठी एक असे एकूण 21 सदस्यांची वर्गवारी निश्चित केली होती. त्यात ओबीसींना स्थान नव्हते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाचे पत्र दि.06 एप्रिल 2023 अन्वये आदेशात नमूद केल्यानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषदबाबत निश्चित केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागांची गणना करून सुधारीत सदस्य संख्या निश्चित करून शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यास कळविले होते. त्याप्रमाणे पूर्वीच्या अधिसूचनेत दिलेल्या सदस्यांच्या वर्गवारीत सुधारणा करून अनु.जातीचे एकूण तीन पैकी दोन महिलांसाठी आरक्षित तर अनु.जमातीसाठी एक जागा( मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरीता राखीव होती त्यामुळे आता ही जागा स्त्रियांसाठी राखीव नसेल) राखीव तसेच कायम ठेवले आहेत. केवळ अराखीव (खुला प्रवर्ग) एकूण 17 पैकी 9 जागा महिलांसाठी ज्या राखीव होत्या त्यात सुधारणा करून त्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी(ओबीसी) एकूण पाच जागा राखीव ठेऊन त्यातील तीन जागा महिलांसाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत. त्यामुळे अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गातील जागा कमी होऊन सुधारीत आराखड्यात त्या एकूण 12 असून त्यातील 6 या महिलांसाठी राखीव आहेत. येत्या पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षित जागांची निश्चिती होऊन ओबीसीचा तिढा सुटल्यामुळे, इच्छुक उमेदवारांना आता आपल्यासाठी योग्य त्या सुरक्षित प्रभागाची निवड करणे शक्य होईल.
No comments:
Post a Comment