किनवट,दि.08 (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यात येत्या खरीप हंगामात 77 हजार 505 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने विविध पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक 20 हजार 157 क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या पिकांसाठी लागणाऱ्या विविध रासायनिक खतांचा 6 हजार 565.554 मे.टनचा साठा तालुक्यात सध्या उपलब्ध असून, येणाऱ्या खरीप हंगामासाठी 19 हजार 737 मे.टन विविध रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस.एम.मुंडे यांनी दै.पुढारी साठी दिली.
तालुक्यातील रब्बी हंगाम आटोपला असल्याने, येत्या खरीप हंगामासाठी किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व बी-बियाणे रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, या अनुषंगाने तालुका कृषी विभाग व पं.स.च्या कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. गतवर्षी 78 हजार 144 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यात 639 हेक्टरची घट झाली असून, 77 हजार 505 हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित केल्या गेल्याचे तालुका कृषी विभागाकडून कळाले आहे.
किनवट तालुक्यातील खरिपातील सर्वात प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाचे यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र 43 हजार 370 हेक्टर आहे. या प्रस्तावित क्षेत्रासाठी 2 लाख 16 हजार 850 बियाण्यांच्या पाकिटांची (वजन 450 ग्रॅम) मागणी करण्यात आली आहे. दुसरे महत्वाचे नगदी पिक असलेल्या सोयाबीनचे यंदाचे प्रस्तावित पेरणीक्षेत्र 25 हजार 490 हेक्टर आहे. या प्रस्तावित क्षेत्रासाठी 19 हजार 118 क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. इतर पिकांमध्ये खरीप ज्वारीचे प्रस्तावित क्षेत्र 812 हेक्टर असून, त्यासाठी 98 क्किंटल बियाणे तर तूर या पिकासाठी 6 हजार 250 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यासाठी 750 क्किंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुगाचे प्रस्तावित पेरणीक्षेत्र 823 हेक्टर असून त्यासाठी 99 क्किंटल तर उडीदासाठी 760 पेरणी क्षेत्र असून, त्यासाठी 92 क्किंटल बियाण्यांची मागणी केलेली आहे.
सध्या किनवट तालुक्यातील विविध कृषी निविष्ठांमध्ये 473.05 मे.टन डीएपी(डॉय अमोनियम फॉस्फेट),28.42 मे.टन एमओपी(म्युरेट ऑफ पोटॅश),2 हजार 815.265 मे.टन एनपीकेएस (नत्र, स्फुरद,पॉलाश व गंधक), 1 हजार 620.95 मे.टन एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट), व 1 हजार 627.869 मे.टन युरीया (नत्र) असा एकूण 6 हजार 565.554 मे.टन रासायनिक खतांचा साठी उपलब्ध आहे. कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी एकूण 19 हजार 737 मेट्रिक टन खतांची मागणी केलेली आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे : 5,599 मे.टन युरीया(नत्र), 3,630 मे.टन डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट),1,385 मे.टन एमओपी(म्युरेट ऑफ पोटॅश), 2,657 मे.टन एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट,337 मे.टन अमोनियम सल्फेट आणि 6,129 मे.टन इतर संयुक्त रासायनिक खते असे एकूण 19 हजार 737 मे.टन रा.खतांची मागणी केलेली आहे.
"हवामानातील बदल आणि पर्जन्यमानाबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले अंदाज लक्षात घेता पावसाची उपलब्धता व पेरणीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस झाल्याशिवाय पेरणी केली जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत कृषिनिविष्ठा केंद्रातूनच खते व बियाणे खरेदी करावीत आणि खरेदी केलेली बिले जपून ठेवावीत"
-एस.एम.मुंडे. कृषी अधिकारी, पंचायत समिती,किनवट
No comments:
Post a Comment