आमच्या न्याय्यहक्कासाठी संघर्ष करीत राहूत - के.पी.परधान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 May 2023

आमच्या न्याय्यहक्कासाठी संघर्ष करीत राहूत - के.पी.परधान

किनवट,(प्रतिनिधी) : आदिवासीची सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी  परधान समाजाने आतापर्यंत देशातील 781 जमातींना सोबत घेउन पुढाकार घेतला असून, यापुढेसुद्धा आम्ही संघटीतरित्या, आमच्या न्याय्यहक्कासाठी संघर्ष करीत राहूत, असे प्रतिपादन आदिवासी परधान जनजाती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के.पी. परधान यांनी केले.


गोकुंदा येथे आयोजित ‘हिरासूका लिंगो जयंती निमित्त प्रबोधन मेळाव्याचे उद्‌घाटन केल्यानंतर समुदायास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आदिवासी समाजाचे धर्मगुरू ‘हिरासुका लिंगो यांची जयंती व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन नुकतेच गोकुंदा येथील के.के.गार्डन येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे उपसचिव अशोक आत्राम, तर प्रमूख अतिथी म्हणून साहित्यिक वसंतराव कन्नाके, प्रभू राजगडकर आणि छत्तीसगड राज्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून गोंड आदिवासी नेते नारायणराव सिडाम हे होते.


     पुढे बोलताना के.पी.परधान म्हणाले की, आदिवासी समाजाचे धर्मगुरू हिरासूका लिंगो यांनी आदिम व्यवस्थेमध्ये निसर्ग न्याय, निसर्ग मर्यादा, निसर्ग समानता या आधारित मानव सृष्टीतील पहीले संविधान प्राचीन काळात मांडले होते. त्याचा पुरावा मोहनजोदाडो व हडप्पा संस्कृतीमध्ये दिसून येतो. आदिवासी जमातीला एक वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला असून, आदिवासी संस्कृती व सभ्यता जगातील सर्व संस्कृती व सभ्यतेची जननी आहे. सध्याच्या तरुणाईला गौरवशाली सांस्कृतीक वारसा लाभलेल्या आदिवासी जमातीचा इतिहास व संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास व संस्कृती अवगत करून जोपासण्यासाठी समाजास संघटीत करून त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे


अध्यक्षयीय समारोपात महाराष्ट्र शासनाचे सचिव आत्राम यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत संघटनेत काम करणाऱ्यांनी अशिक्षित असलेल्या आदिवासी समाजासाठी काम करावे, असे आवाहन केले. यावेळी साहित्यीक वसंत कन्नाके, प्रभू राजगडकर आदींनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी केले. सूत्रसंचालन शेषेराव कोवे व रामस्वरूप मडावी यांनी केले तर आभार रामदास मेश्राम यांनी मानले .


यावेळी आदिवासी परधान जनजाती संघटेनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ज्येष्ठ आदिवासी नेते नारायणराव सिडाम यांची नियुक्ती करत असल्याची  घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष के.पी .परधान यांनी केली. दरम्यान, सरपंच राजाराम कोवे, सौ.अनुसयाताई संजय सिडाम, पुडंलिक गेडाम, गोंविद धूर्वे, शशांक कन्नाके, रामदास तोडसाम, मंगला नैताम, वंदना उईके, सिताबाई आडे, उत्तम मेश्राम, कचरूमल चौधरी, अशोक सिडाम, अनिल कुलसंगे, गोविंद मेश्राम, माधव कुमरे, उत्तम मेश्राम आदींचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात मोहन कोवे, प्रभू आत्राम, सूभाष कन्नाके, विजय मडावी, गोपाल कन्नाके, शाम डोगरे, घनशाम कोवे, सुरेखा घाटकर, मनिषा चौधरी, कोडंबा गेडाम, ज्ञानेश्वर सिडाम , जितेद्र कुलसंगे, संतोष पहूरकर, संतोष कन्नाके यांचेसह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Pages