शेतकऱ्यांनी अनधिकृत ‘एचटीबीटी’ कापूस बियाणांची खरेदी व लागवड करू नये - बालाजी मुंडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 13 May 2023

शेतकऱ्यांनी अनधिकृत ‘एचटीबीटी’ कापूस बियाणांची खरेदी व लागवड करू नये - बालाजी मुंडे


 किनवट : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाची मान्यता नसलेले अनधिकृत ‘एचटीबीटी’ (हर्बिसाईड टॉलरंट) कापूस बियाणे खरेदी आणि लागवड न करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.


    किनवट तालुका कृषी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांनी कुठल्याही अनधिकृत कंपन्याच्या आमिषांना बळी पडून नुकसान करून घेऊ नये म्हणून प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करून सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकात म्हटले की, बाजारात बोगस कंपन्या, खाजगी व्यक्तींमार्फत परवाना नसलेली अनधिकृत ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत बी.टी. बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर-आर.बी.टी. व बी.टी.- बी.जी.3 इत्यादी नावाने संबोधतात. ‘एचटीबीटी’ आणि इतर विविध नावे दिलेल्या या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. अशा प्रकारचे बी-बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे.


     अनधिकृत कापूस बियाणाची लागवड केलेल्या पिकाच्या पानांचे नमुने व उत्पादित कापसाचे नमुने घेऊन त्यांची ‘एचटीबीटी’ जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. तपासणी अंती ‘एचटीबीटी’ जनुके आढळल्यास संबंधितांवर अनुषंगिक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारचे अनाधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या, खासगी एजंट, खाजगी व्यक्ती निरनिराळे आमिष दाखवून प्रलोभन देतील. त्यास शेतकऱ्यांनी बळी पडू नये. कारण त्यात फसवणूक होऊ शकते. तसेच एखाद्या व्यक्तीकडे अशी अनधिकृत एच.टी.बी..टी. बियाणे आढळल्यास, त्यांच्यावर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल. याबाबत कृषी विभाग व पोलीस विभाग सतर्क असून सर्व बी.टी. बियाणे विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून असल्यामुळे, कुणीही सदरील अनधिकृत बियाणे विक्रीचा प्रयत्न करू नये.


      शासनाची मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी बियाणे लागवडीनंतर ‘ग्लायफोसेट’ हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. दरम्यान ‘ग्लायफोसेट’ हे तणनाशक कार्सिनोजनीक गुणधर्माचे असून त्याच्या वापरामुळे मानवी आरोग्यास ‘कॅन्सर’ सारखे रोग उदभवण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या अतीवापरामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होऊन, भविष्यात त्या जमिनीत कोणत्याही पिकांची लागवड करता येणार नाही. जमीन अक्षरश: नापिक होईल. सर्व शेतकरी शेतमजूर यांचे आरोग्य धोक्यात येईल, ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाचा केवळ पिके नसलेल्या जमिनीवर व चहा मळ्यासाठी वापर करण्याची शिफारस केंद्र शासनाने केलेली आहे.


      त्यामुळे शेतकऱ्यांनी संभाव्य हानी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून राज्यात परवानगी असलेले अधिसुचित बी.टी.बियाणेच पावतीसह खरेदी करावे. अनाधिकृतपणे प्रलोभने देणाऱ्यांविषयी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात तक्रार करावी. तक्रारकर्त्याचे नाव व पत्ता गोपनीय ठेवला जाईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages