किनवट : मर्यादेपेक्षा अधिकची रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच येथील तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या आदेशावरून मंगळवारी (दि.09) एक टिप्पर व एक हायवा वाहन जप्त करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
तालुक्यात गेल्या कांही दिवसांपासून रेतीची तस्करी जोमाने सुरु आहे. या धंद्यांत मोठी कमाई असल्याचे दिसताच राजकीय वरदहस्त असलेले पदाधिकारी तस्करीत गुंतले आहेत. वाळू घाटांचा लिलाव होत नसल्याने, शासनाने वाळू वाहतुकीबाबत नवा निर्णय घेतला आहे. तथापि, एकाच परमीटवर वारेमाप वाळू उपसण्यावर तस्करांचा डाव आहे. मंगळवारी तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांना रेती वाहतुकीबाबत शंका आली. त्यानंतर त्यांनी दोन वाहनांचे जीपीएस लोकेशन तपासले. तपासणीनंतर त्यांनी मंडळाधिकारी व तलाठ्यांना आदेश देऊन शहराच्या हद्दीत एक, तर वडोली गावाजवळ एक अशी दोन वाहने जप्त करायला लावली. सदर वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली आहेत. येथील महसूल प्रशासनाने सन 2022-23 या वर्षभरात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या 32 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तस्करांकडून तब्बल 52 लाख रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. तस्करीवर आळा घालण्याच्या दृष्टीने घोटी फाटा येथे महसूलचे बैठे पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली.
No comments:
Post a Comment