किनवट: किनवट माहूर तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161(ए) या रस्त्याचे काम मागील सहा वर्षापासून प्रलंबित असून, हा रस्ता लवकर पूर्ण व्हावा म्हणून अनेकवेळा प्रयत्न करण्यात आलेले आहेत. या अर्धवट रस्त्यामुळे मतदारसंघातील अनेक नागरिकांचे अपघात होऊन, काहींनी जीवसुद्धा गमावलेला आहे. त्यामुळे सदर मार्ग तयार करतांना सुरक्षाविषयक सर्व उपाययोजनांचे अवलंबन करून त्वरित पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी येथील तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले की, इस्लापूर ते धनोडा या तयार होणाऱ्या महामार्गावर मुख्य रस्त्यापासून विविध गावांना जोडणारे जे जोड रस्ते आहेत, त्या जोड रस्त्यांना सर्व्हिस रोड व अप्रोच रोड तयार केल्यास होणारे अपघात होणार नाहीत आणि नियमाप्रमाणे मुख्य रस्त्याच्या उंची सोबत जोड रस्त्याची उंची किमान 50 मिटर लांबपर्यंत निमूळती करणे आवश्यक असते, तसे ते करण्यात यावेत. संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना व लोकप्रतिनिधींना योग्य तो प्रतिसाद अद्यापपर्यंत दिलेला नसल्यामुळे, त्यांच्याविषयी प्रचंड रोष तयार झालेला आहे. गत काही दिवस अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे अनेक वळणरस्ते वाहून जाऊन, रहदारी ठप्प झालेली होती. पावसाळ्यामध्ये किनवट शहर व तालुक्याला जोडणाऱ्या विविध पुलावरुन पाणी जात असल्याने व अनेक पूल हे अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने, तालुक्याचा संपर्क तुटणे हे दरवर्षीचेच दुखणे झालेले आहे. ती परिस्थिती यंदाही येणार म्हणून नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
किमान 30 मिटर रुंद जागा उपलब्ध असेल तरच रेल्वे उड्डाण पुलासह राष्ट्रीय महामार्ग मंजूर होत असतो आणि तसा नियम आहे. 161 ए हा महामार्ग मंजूर होत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 30 मिटर रुंदीची जागा हस्तांतरीत केली होती. त्यामुळे गोकुंदा येथील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भविष्यातील तालुक्यातील दळणवळणाची गरज पाहता गोकुंदा येथे रेल्वे उड्डाण पूल होणे अत्यावश्यक आहे. मात्र, किनवट शहरातील काही मालमत्ताधारकांचे या महामार्गामुळे हानी होत अ्सल्यामुळे, रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी घेऊन ते उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळेच सदर उड्डान पुलाचे काम अडकले असल्याचे समजते.
या वरील उपाययोजना म्हणून ज्या मालमत्तेसंबंधी वाद आहे तेवढी जागा निकालापर्यंत सोडून उर्वरीत महामार्गाचे बांधकाम पूर्ण रुंदीनिशी केल्यास, गोकुंदा उड्डाणपुलाबाबतचा अडथळा दूर होऊन तो पूल लवकर बांधता येईल. या सर्व गोष्टी करण्यासाठी सकारात्मक मानसीकता लागते. मात्र, संबंधित कंत्राटदार ज्या कासवगतीने काम करीत आहे, ते पाहता हा कंत्राटदार 80 टक्के काम पूर्ण करून पळ काढू शकतो. कारण झालेल्या दीर्घ विलंबामुळे सद्य परिस्थितीत तेच त्यांच्या सोईचे व लाभाचे ठरणार आहे. परिणामी, अपूर्ण रस्त्यामुळे परत दळणवळत बाधित होऊ शकते.
मागे झालेल्या पैनगंगा अभयारण्य सनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष तथा यवतामाळचे जिल्हाधिकारी यांनी सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए हा पैनगंगा वन्यजीव अभयारण्याच्या इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये येत नसून, सदर ठिकाणी 30 मीटर रुंदीचा महामार्ग करण्यास काहीच हरकत नाही असा ठराव मंजूर करुन जिल्हाधिकारी नांदेड अर्थात आपल्याकडेच पुढील कार्यवाहीकरिता पाठवलेला होता. या संदर्भात सहा महिन्यापूर्वी मी माझ्या शिष्टमंडळासह आपली भेट घेऊन पुढील कार्यवाहीसाठी विनंती देखील केलेली होती. या महामार्गासंदर्भात किनवट येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांचे महामार्गासंदर्भात कोणतेच आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मी पुनश्च निवेदनाद्वारे या गंभीर व संवेदनशील विषयासंदर्भात आपण त्वरित कार्यवाही करून अनेक वर्षापासून या महामार्ग पिडीत लोकांना दिलासा द्यावा, अशी विनंती करीत असल्याचे नमूद केले आहे.
माजी आमदार प्रदीप नाईक यांनी या निवेदनासोबत मुंबई हायवे ॲक्ट 1955 अंतर्गत नमूद 30 मीटर राज्यमार्गाची कागदपत्रे, राष्ट्रीय पर्यावरण मंत्रालयाचे 30 नोव्हेंबर 2016 चे नोटिफिकेशन. (पैनगंगा अभयारण्या संदर्भात), 23 मार्च 2022 रोजी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय महामार्ग संदर्भातील लोकप्रतिनिधींसोबतच्या बैठकीचे वृतांत, पैनगंगा अभयारण्य सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे दि. 30.06.2022 रोजीचे महामार्गाची रुंदी 30 मीटर करण्यास हरकत नसून, पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेले पत्र आणि राष्ट्रीय महामार्ग घोषित करतांना किमान रुंदी संदर्भातील शासन नियमांचे नोटीफिकेशन. ही सर्व कागदपत्रे योग्य त्या कार्यवाहीसाठी उपयोगी पडावीत म्हणून जोडलेले आहेत.
No comments:
Post a Comment