पुलाचे संरक्षण कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता बळावली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 11 May 2023

पुलाचे संरक्षण कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता बळावली

किनवट :  शहराजवळील मराठवाडा व विदर्भास जोडणाऱ्या पैनगंगा नदीवर असलेल्या पुलाचे संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटले असून, बरेच गायब झालेले आहेत. रस्त्याची अत्यंत दुरवस्था असून, त्यामुळे  अपघातात होण्याची शक्यता बळावली आहे. उद्या गुरूवारी (दि.11) याच पुलापलीकडील शेतामध्ये भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोयर यांच्या चिरंजीवांचे लग्न असून, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेसह आमदार,खासदार, विविध नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे समजते. अशा परिस्थितीत वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे देवकृपेने काही अपघात होऊ नये म्हणजे मिळवली, अशी चर्चा नागरिकांत आहे.


        सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे यापूर्वीसुद्धा सकाळी मार्निंग वॉक साठी आलेले दोन-तीन व्यक्ती कठडे नसल्यामुळे अपघात होऊन खाली कोसळल्याचे समजते. पैनगंगा नदीच्या पात्रात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. सदर पूल फार प्रशस्त नसून, जेमतेम दोन पदरी अरुंद रस्त्यावरून वाहने ये जा करतात. पुलाचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे व काही गायब झाल्यामुळे एखादी अनुचित घटना घडून मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  पुलावरील रस्ताही मोठमोठ्या खाच-खळग्यांनी भरलेला आहे. या पुलावरून कोसळून बरीच जनावरे ही मृत्यूमुखी पडल्याचे सांगण्यात आले. 


      अशा पार्श्वभूमीवर किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोयर यांचे शेत या पुलापलीकडे विदर्भात असून, गुरूवारी या शेतातच त्यांच्या चिरंजीवांच्या शुभविवाहाचे आयोजन आहे. यासाठी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, मदन येरावार, आमदार भीमराव केराम आदी नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे अनेक दिवसापासून सर्वश्रुत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग किनवट व उमरखेड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुलाची व रस्त्याची कुठल्याच प्रकारची डागडुजी वा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला नसल्याबद्दल चर्चा होऊन आश्चर्य व्यकत केल्या जात आहे. दुर्देवाने एखादा अपघात घडल्यास त्याचे खापर या दोन्ही तालुक्यातील सा.बा.विभागावरच फुटेल.., हेही तितकेच खरे..!

No comments:

Post a Comment

Pages