'माझे आयुष्य आठ वर्षांनी वाढविण्याचे श्रेय हे सविताचे आहे.' हे उदगार आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे.'भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म 'या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ.सविता कृष्णा कबीर यांच्याशी विवाह केला तेंव्हा त्यांना अनेक दुर्धर व्याधींनी ग्रासले होते, त्यात मधुमेह, रक्तदाब,संधिवात, न्यूराइटीज या सारख्या व्याधी होत्या.
बाबासाहेबांचे जीवन सामाजिक आंदोलनात व्यस्त होते.27 जुलै 1942पासून त्यांनी दिल्लीत मजूर मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला होता.त्यामुळे त्यांचे संपूर्ण भारतभर फिरणे होत असे.त्यांनी चालवलेले वर्तमानपत्र, शेड्युल कास्ट फेडरेशनचे काम,पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे काम,सोसायटीमार्फत सुरू केलेले मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे काम,संविधान सभेतील सदस्य म्हणून काम तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून असलेले काम, मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे संविधान निर्मितीचे काम,या सगळ्या कामांमुळे बाबासाहेब प्रचंड व्यस्त असत. त्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसे.अशावेळी त्यांच्या औषधांच्या वेळा चुकत,आणि डॉक्टरांचे बोलणे त्यांना खावे लागे.
डॉ.राव बाबासाहेबांचे मित्र होते, मुंबईत आल्यावर ते त्यांना भेटत असत.बाबासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉ.राव यांनी डॉ.माधव डी. मालवणकर यांची ओळख करून दिली होती. बाबासाहेबांच्या प्रकृतीची काळजी मालवणकर घेत असत.एकदा डॉक्टरांनी बाबासाहेबांना सुचवले,'तुम्ही तुमच्या औषधांच्या वेळा पाळत नसल्यामुळें तुम्ही तुमच्या देखभालीसाठी एक वैदयकीय क्षेत्रातील महिती असलेली व्यक्ती ठेवा.'तुम्ही लग्न करा किंवा मृत्यूला कवटाळा' .
याबाबत बाबासाहेब दादासाहेब गायकवाड यांना 16 मार्च 1948 च्या पत्रात कळवतात,"माझे मित्र आणि वैदयकीय सल्लागारांनी निश्चित स्वरूपात सांगितले आहे की,मधुमेहातून वाचण्यासाठी आहार आणि इन्सुलन याकडे लक्ष देणारे कोणी असावे. जर माझी लग्न करण्याची इच्छा नसेल तर ते मला परिचारिका किंवा घरव्यवस्था पाहणारी एखादी व्यक्ती ठेवण्याचा आग्रह करीत आहेत. पण ते लोकापवादाला कारण ठरेल.उत्तम मार्ग म्हणजे लग्न करणे,यशवंतांच्या आईच्या निधनानंतर मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता परिस्थितीने नवीन निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.वैद्यकीय व्यवसायी,उत्तम स्वयंपाकी,व सुशिक्षित या तिन्ही गुणांचा समन्वय असणारी स्त्री आपल्या समाजात मिळणे अशक्य आहे .नशिबाने मी एक शोधू शकलो आहे, सारस्वत ब्राम्हण आहे.ठरल्याप्रमाणे 15 एप्रिल रोजी लग्न होईल, हे गुप्त ठेवा.
या परिस्थितीत बाबासाहेबांनी रमाईंच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.तोही प्रकृतीच्या देखभालीसाठी.
जेंव्हा बाबासाहेबांनी माईसाहेबांशी लग्न केले तेंव्हा ते 57 वर्षांचे होते आणि माईसाहेब होत्या 36 वर्षाच्या म्हणजे त्यांच्या वयात 21 वर्षांचे अंतर होते.
बाबासाहेबांची माईसाहेबांनी 8 वर्ष अविरत सेवा केली. बाबासाहेब कुठेही गेले की त्या त्यांच्यासोबत सावलीसारख्या असायच्या.बाबासाहेबांना वेळेवर आहार आणि इन्सुलन देण्याचे काम त्या नं कंटाळता करत होत्या .
21 जून 1948 ला हिंदू कोड बिल ला डॉ राजेंद्र प्रसाद यांनी विरोध केला.पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दर्शविला.12 ऑगस्ट ला सुधारित हिंदू कोडबील मांडले गेले.' अनटचेबल्स'हा महान ग्रंथ 18 ऑक्टोबर 1948 ला प्रकाशित झाला.
4 नोव्हेंबर 1948 ला घटना समितीचा मसुदा संविधान समितीला सादर केला गेला.26 नोव्हेंबर 1949 ला घटना संविधानसभेकडून स्वीकारली गेली .
28सप्टेंबर 19 51 ला हिंदू कोडबीलाच्या मान्यतेवरून झालेल्या वादविवादानंतर बाबासाहेबांनी आपला राजीनामा पंडित नेहरूंना सोपवला.
1952 च्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्व मुंबईतून शे.का.फे. कडून उमेदवार होते ते काँग्रेसच्या काजरोळकर कडून पराभूत झाले.
8 मार्च 1952 रोजी मुंबईतून राज्यसभेवर निवडून गेले.4 जानेवारी 1954 आचार्य अत्रे यांच्या 'महात्मा फुले' चित्रपटाचा बाबासाहेबांच्या हस्ते मुहूर्त.1954 मध्ये भंडारा पोट निवडणुकीत बाबासाहेबांना पराभव स्वीकारावा लागला.1956 ला मुंबईत विधी महाविद्यालय सुरू केले,14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे माईसाहेबांसह लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची शपथ घेतली. या सर्व कार्यक्रमाच्या माईसाहेब साक्षीदार होत्या.
16 डिसेंबर 1956 ला मुंबई येथे विशाल धम्मदीक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पण त्या आधीच बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाले.
बाबासाहेबांचे महानिर्वाण हे नैसर्गिक नसून माईसाहेबांचे कट करस्थान आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या.16 ऑगस्टचा भव्य धम्मदीक्षा कार्यक्रम होऊ नये, हे ब्राम्हणी षडयंत्र होते, अशी हाकाटी पिटाळली गेली.संपूर्ण समाजाला माईसाहेबांच्या विरोधात केले गेले.ज्या माईसाहेबांनी बाबासाहेब आजारी असताना त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याशी लग्न केले .त्यांनी सतत आठ वर्षे बाबासाहेबांची सेवा केली,त्या बाबासाहेबांचा घात कसा काय करतील?
माई साहेब बाबासाहेबांच्या मृत्यूच्या षडयंत्राचा भाग असत्या तर त्यांनी 14 ऑक्टोबर चा धम्मदीक्षा कार्यक्रम तरी का होऊ दिला असता?त्यांचे वडील हे बंडखोर आणि सुधारणावादी विचार सरणीचे होते.त्यांच्या इतर बहिणींचे विवाहसुद्धा आंतरजातीय होते.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर चळवळीची सूत्रे माईसाहेबांकडे येतील आणि तत्कालीन रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांची दुकाने बंद होतील. म्हणून त्यांनीच,माईसाहेब बाबासाहेबांच्या खुनी आहेत,या अफवेला खतपाणी घातले असावे.
माईसाहेब या ब्राम्हण होत्या,हा काय त्यांचा दोष होता का?
त्यांनी बाबासाहेबांच्या राजकीय सामाजिक कार्यात मदतच केली आहे,
बाबासाहेबांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांना भेटू देत नसत,या कारणावरून त्या बाबासाहेबांच्या खुनी आहेत हे कसे ठरवता येईल? कोणत्याही बायकोला नवऱ्याची काळजी असतेच .नवरा आजारी असताना कार्यकर्ते येऊन त्यांना त्रास देतील हे कोणत्या बायकोला सहन झाले असते?माईसाहेबांच्या या भूमिकेला घातपाताचा एक भाग मानला जाणे कितपत योग्य आहे?
त्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अप्रकाशित साहित्य शासनामार्फत प्रकाशित केले,त्यांच्या काही वापरातील वस्तू पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेला भेट म्हणून दिल्या.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी त्यांनी आंबेडकरी संघटनांच्या लढ्यात योगदान दिले.
माईंच्या प्रयत्नाने डॉ.जब्बार पटेल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट प्रकाशित करू शकले.
बाबासाहेबांच्या नावाने टपाल तिकीट काढावे, बाबासाहेबांचे छायाचित्र चलनी नोटांवर असावे. बाबासाहेबांच्या जीवन चरित्राचा भाग शैक्षणिक अभ्यासक्रमात असावा,बौद्धांनाही सवलती असाव्यात. यासारख्या मागण्यांचा पाठपुरावा माईसाहेबांनी केला होता
.1991 च्या जनगणनेत आंबेडकरी अनुयायांनी आपली नोंद बौद्ध म्हणून करावी , असे त्यांनी आवाहन केले होते.
मा.विजय सुरवाडे सहकार्याने त्यांनी,'डॉ.आंबेडकरांच्या सहवासात'हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहून कल्याणच्या देवचंद अंबाडे यांच्या तथागत प्रकाशनाकडून प्रकाशित करून अनेक गोष्टींना उजाळा दिला.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बरेच वर्षे त्या अज्ञातवासात होत्या. त्यांना भीम अनुयायांची भीती होती.पँथर आंदोलनांनंतर त्या पुन्हा सार्वजनिक जीवनात आल्या. राजा ढाले,ज.वी.पवार, नामदेव ढसाळ,रामदास आठवले,रमेश व्हटकर यासारख्या कार्यकर्त्यानी त्यांना पुन्हा सामाजिक जीवनात आणले.
माई खऱ्या अर्थाने बौद्ध होत्या.कार्यकर्ते जयभीम म्हणायचे तेंव्हा त्या कार्यकर्त्याला जय बुद्ध असेही म्हणायला लावायच्या.
'भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाचे टाचणे काढण्यासाठी माईंनी बाबासाहेबांना मदत केली आहे. तसेच ग्रंथांचे प्रूफ तपासण्याचे काम करून त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यास हातभार लावला आहे. बाबासाहेबांची काळजी त्यांनी घेतली म्हणून बाबासाहेबांचे आयुष्य आठ वर्षांनी वाढले. असे बाबासाहेबांनी स्वतःच म्हटले आहे.त्या बाबासाहेबांच्या अर्धांगिनी होत्या.बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण त्यांचा आदर करायला पाहिजे.जसे कुठल्याही कार्यक्रमात आपण डॉ.बाबासाहेब यांच्या नावाच्या सोबत माता रमाईंचे नाव घेतो तसेच माईसाहेबांचे सुद्धा नाव आदराने घेतले पाहिजे.
माईंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
- मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन
No comments:
Post a Comment