बोधडी मंडळात अवकाळीची अतिवृष्टी ; इस्लापूर व जलधारा मंडळातही धुंवाधार पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 6 May 2023

बोधडी मंडळात अवकाळीची अतिवृष्टी ; इस्लापूर व जलधारा मंडळातही धुंवाधार पाऊस

किनवट :  तालुक्यात गत पंधरा दिवसापासून बेमोसमी पावसाचा तडाखा सुरू आहे. गुरूवारी बोधडी मंडळात तुफान पाऊस पडला असून, त्या मंडळात अवकाळीच्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोबतच इस्लापूर व जलधार मंडळातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटींग केल्यामुळे या तीन मंडळातील उन्हाळी शेतीपिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासांत तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 170.5 मि.मी.असून, त्याची सरासरी 18.94 मि.मी.आहे.


     मे महिन्याच्या गत पाच दिवसामध्ये सोमवारी सर्वच मंडळात दमदार पाऊस कोसळला असून, त्याची सरासरी 34.3 मि.मी. आहे. मंगळवारी पावसाने थोडी विश्रांती घेऊन परत बुधवारी सर्व महसूल मंडळात मुसळधार पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी 25.4 मि.मी.आहे. गुरूवारी केवळ सिंदगी मंडळात दमदार तर बाकीच्या मंडळात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.


   शासनाच्या निकषानुसार गत 24 तासात 65 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यास, त्याची नोंद अतिवृष्टी म्हणून केली जाते. त्या अनुषंगाने  गुरूवारी बोधडी मंडळात 67 मि.मी. पाऊस झाल्याने, तिथे अवकाळी पावसाच्या अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.


शुक्रवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 मे पासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 2.3 (44.1 मि.मी.); बोधडी- 67.0 (148.3 मि.मी.); इस्लापूर- 60.8 (107.9 मि.मी.); जलधरा- 23.0 (77.3 मि.मी.); शिवणी- 5.8(48.1 मि.मी.); मांडवी- 1.5(77.6 मि.मी.);  दहेली- 0.8(66.7 मि.मी.), सिंदगी मो. 3.0 (102.6 मि.मी.); उमरी बाजार 6.3 (72.1 मि.मी.).

    तालुक्यात एक मे पासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण अवकाळी पाऊस 744.7  मि.मी.असून, त्याची सरासरी 82.74 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस बोधडी मंडळात झाला असून, सर्वात कमी सिंदगी किनवट मंडळात झालेला आहे. किनवट तालुक्यात मे महिन्यात पडणारा सरासरी पाऊस 3.91 मि.मी.आहे. मात्र मंगळवार सोडून गत चार दिवसात तालुक्यात सरासरी 82.74  मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. जो मे सरासरीच्या तुलनेत  2,120.5 टक्के  आहे.


    बोधडी,जलधारा व इस्लापूर मंडळात झालेल्या जोरदार वृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन ते पाणी काठावरील शेतांत शिरल्यामुळे तेथील पिके भूईसपाट झाली आहेत असे तेथील शेतकर्‍यांकडून समजले. गत पाच सहा वर्षापासून कूर्मगतीने होणार्‍या  महामार्गावर दरवर्षीप्रमाणे चिखली पुलाजवळील वळणरस्ता वाहून जाऊन वाहतूक ठप्प झाली. या परिसरातील आंतररस्ते सुद्धा नाले भरून वहात असल्यामुळे रहदारी बंद पडल्याचे कळते. शासकीय सुट्टीमुळे या तीन मंडळात झालेली अधिकृत हानी समजू शकली नाही.

No comments:

Post a Comment

Pages