किनवट तालुक्यात अखेर पावसाचे आगमन शेवटी आद्रा नक्षत्र फळले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 June 2023

किनवट तालुक्यात अखेर पावसाचे आगमन शेवटी आद्रा नक्षत्र फळले

किनवट,दि.24(प्रतिनिधी) : मृगनक्षत्र संपला तरी पाऊस बेपत्ता असल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. हवालदील झालेले शेतकरी आर्द्रा नक्षत्रतरी फळते का म्हणून चातकासारखी पावसाची वाट पहात होते. दोन-तीन दिवसापूर्वी धोंड्या-धोंड्या पाणी दे... म्हणत परिसरातील लोकांनी वरुणराजाला साकडेही घातले होते. अखेर सर्वांची प्रार्थना फलद्रूप होऊन गुरूवारी रात्री अन्‌ शुक्रवारी सकाळी आकाशात काळे ढग दाटून पावसाने हलकीशी का होईना हजेरी लावली.


  . मृगनक्षत्रात हमखास पावसाची हजेरी लागतेच.परंतु गेल्या कित्येक वर्षांनंतर यंदा मृगनक्षत्र पूर्णतः कोरडे गेले. आषाढीच्या दिंड्या पंढरीच्या पायथ्याशी असताना दरवर्षी खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असतात. सोमवार (दि.19) पासून आषाढ महिन्याला सुरूवात झाली असताना पावसाचा अंदाज दिसत नव्हता. 'बीपरजॉय' चक्रीवादळामुळे पाऊस लांबला असताना जूनचे तीन आठवडे संपूनही कमाल, किमान तापमानात घट होत नव्हती. मृगनक्षत्र कोरडे जात असताना आर्द्रा नक्षत्रात तरी भरपूर पाऊस पडावा, यासाठी सोमवारी युवकांनी परंपरागत पद्धतीने धोंड्या धोंड्या पाणी दे, साय- माय पिकू दे, गाय- वासराला चारा दे, नदी - नाला वाहू दे, अशी आर्जवं वरुणराजाला केली होती. ही आर्जवं करतानाच पावसासाठी भंडारा करण्याचा मानसही युवकांनी बोलून दाखविला होता. परवापर्यंत किनवट शहराचे कमाल तापमान 41 अंशांवर होते. दुपारी बारा नंतर उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाहीलाही होत होती. .दरम्यान, पावसाच्या दडीमुळे सर्वचजण व्याकूळ होऊन, पावसाअभावी चारा,पाणी टंचाईसदृशस्थिती निर्माण झाली होती.


 अखेर शुक्रवारी सकाळपासून आकाश ढगाळलेले होऊन दुपारी एकच्या आसपास  पावसाच्या सरी कोसळल्या. वातावरण एकदम थंड होऊन, नागरिकांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे.


   प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी गुरूवारी (दि.22) दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 22, 23 व 24 जून 2023 या  तीन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. उपरोल्लेखित तीन दिवशी जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. ती अक्षरश: खरी ठरावी असं  सर्वाना वाटत आहे.


       किनवट तालुक्याची जून महिन्यातील आजपर्यंतची पावसाची सरासरी 145.3 मि.मी.आहे. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत केवळ 6.2 मि.मी. पाऊस पडलेला आहे. अर्थात तब्बल 139.1 मि.मी. पावसाची तूट आहे. तालुक्यातील नऊ महसूल मंडळात जूनमहिन्यातील आजपर्यंतचा पाऊस पुढील प्रमाणे : किनवट- 9.8 मि.मी.,बोधडी-405 मि.मी., इस्लापूर-7.6 मि.मी., जलधरा-3.5 मि.मी., शिवनी-8.7 मि.मी.,मांडवी-2.1 मि.मी., दहेली-4.6 मि.मी., सिंदगी-14.8 मि.मी.,उमरीबाजार-1.3 मि.मी.

No comments:

Post a Comment

Pages