जमिनीच्या प्रश्नी आरपार लढ्यासाठी सज्ज व्हा - कॉ.अर्जुन आडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 June 2023

जमिनीच्या प्रश्नी आरपार लढ्यासाठी सज्ज व्हा - कॉ.अर्जुन आडे

किनवट,दि.19(प्रतिनिधी) : केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून जमीन धारकांची दिशाभूल करण्याचे काम शासन आणि प्रशासन करत आहे. आपल्या हक्काच्या जमिनीच्या मालकीसाठी आता आर-पार लढ्याशिवाय गत्यंतर नसून, यासाठी जमीन धारक तसेच भूमिहीन शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.अर्जुन आडे यांनी केले.


     अखिल भारतीय किसान सभा किनवट तालुका समितीची बैठक इस्लापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवारी (दि.18) शेतकरी नेते कॉ.अर्जुन आडे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.


       वन, गायरान व देवस्थानजमीन तथा भूमिहीन मजुरांच्या प्रश्नांवर आगामी काळात आर-पार लढ्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. पिढ्यान्‌ पिढ्या कसत आलेल्या आणि ताब्यात असलेल्या वन,गायरान,देवस्थान जमिनीच्या मालकी हक्कासाठी किसान सभेने सातत्याने अनेक आंदोलनाद्वारे शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. परंतु अद्यापही झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. या पार्श्वभूमीवर येत्या ऑगस्ट मध्ये हजारो वन,गायरान व देवस्थान जमीन धारकांचा महाघेराव आंदोलनाचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.


      आंदोलनासाठी पुढील प्रमाणे मागण्या ठरविण्यात आल्या. वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे वन पट्टे मंजूर करा, अपाञ दावे पाञ करा, वन अधिकार कायद्याची ठोस अंलबजावणी करा, गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे करा, वन जमीन, गायरान जमिनीवरून बेदखल करण्याच्या नोटीसा, कार्यवाही तातडीने थांबवा, देवस्थान जमीन  कसणाऱ्यांच्या नावे करा, भूमिहीन दलित, आदिवासींना शासनाच्या योजना लागू करुन कसण्यासाठी जमिन द्या, गायरान, सरकारी जागेवर घरे बांधून राहणाऱ्यांची घरे नियमीत करा, आदि मागण्यांच्या बाबत बैठकीत एकमताने ठराव घेण्यात आले. तसेच 09 ऑगस्ट या क्रांती दिनी जमीन धारकांच्या संघर्षाचा एल्गार गाव, वाडी, तांड्यावर घेऊन जाण्याचा संकल्प किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.


   बैठकीस कॉ.खंडेराव कानडे, कॉ.शेषराव ढोले, कॉ.राम कंडेल, कॉ.परमेश्वर गायकवाड, कॉ.प्रसाराम जाधव, कॉ.दिलीप तुललवाड, कॉ.सीताराम आडे, कॉ.अडेलु बोनगीर, कॉ.जनार्दन काळे, कॉ.मनोज सल्लावार, कॉ.मोहन जाधव, कॉ.तानाजी राठोड, कॉ.इरफान पठाण , कॉ.धनराज आडे, कॉ.राम राठोड, कॉ.सुरेखा मेंढकें  आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Pages