मिलिंद कला महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 June 2023

मिलिंद कला महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

औरंगाबाद,(छ. संभाजीनगर) : मिलिंद कला  महाविद्यालयाच्या २००५ बॅच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे हे होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे काही प्राध्यापक व काही माजी विद्यार्थी हे मृत्यू पावले त्यांना कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाच्या बॅच २००५ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह  देऊन सत्कार केला. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप घोंगडे (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे) यांनी केले. माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यामागील  भूमिका विशद केली. महाविद्यालयातील शिक्षकांमुळेच आज आम्ही जीवनात यशस्वी झालो आहोत यामुळे सर्व शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यासाठी तसेच महाविद्यालय विकासात माजी विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत मांडणी केली.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले कि, मिलिंद महाविद्यालय एक ऊर्जा निर्माण करणारे महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी हे वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत हि महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. या महाविद्यालयात येणार प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी हा वेगळ्या पार्श्वभूमीतून येत असतात. डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर जीवनाची वाटचाल करीत आहेत. हे महाविद्यालय व महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते. आपण ज्याठिकाणी असाल त्या ठिकाणी आज देशामध्ये असणारे वातावरण व परिस्थिती हे प्रतिक्रांतीचे उदाहरण आहे. आताच्या वस्तुस्थितीचे विश्लेषण करून आपण आपण देशासमोर आदर्श निर्माण करावा असे मार्गदर्शन डॉ. आल्टे यांनी केले.  मिलिंद कला महाविद्यालयचे प्रा. डॉ. शंकर गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. पी. बुरकूल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप डॉ. वैशाली प्रधान यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले कि, महाविद्यालयाच्या वर्धापन दिनापासून  महाविद्यालयाच्या वेबसाईटवर माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आव्हान त्यांनी माजी विद्यार्थ्यांना केले. मिलिंद महाविद्यालय माझ्या रक्तात आहे. महाविद्यालयात वेगवेगळे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले तसेच चार विषयाचे  संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहेत याबाबत त्यांनी माहिती दिली. निस्वार्थ भावनेने लोक मिलिंदसाठी काम करतात आपणही एकत्र येऊन मिलिंद महाविद्यालयाच्या विकासात आपला हातभार लावला पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी कधीही महाविद्यालयात यावे त्यांचे आम्ही स्वागतच करू असे डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले.


कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या बॅच २००५ चे माजी विद्यार्थी मुंबई, पनवेल, अलिबाग, धुळे, नंदुरबार, परभणी, जिंतूर, जळगाव व इतर शहरातून मोठ्या संख्येने कार्यक्रमास आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुरलीधर इंगोले व प्रा. थॉमस पडघन यांनी केले. कार्यक्रमाचे आभार  प्रकाश पठाडे व  प्रा. रामदास जमनूके यांनी मानले.


माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन संतोष जोंधळे, देवधन धुवे, प्रा. डॉ. दिलीप घोंगडे, प्रकाश पठाडे, राहुल घुगे, थॉमस पडघन, डॉ. मुरलीधर इंगोले, प्रवीण दवणे व डॉ. मिलिंद आठवले यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages