पुरवठा विभागात कायमस्वरूपी नायब तहसीलदार नियुक्ती ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 19 June 2023

पुरवठा विभागात कायमस्वरूपी नायब तहसीलदार नियुक्ती ची मागणी

किनवट,दि.१९: तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नायब तहसीलदार हे पद त्वरीत भरण्यात यावे,अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संघटनेने एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे नुकतीच केली आहे.

   किनवट तहसील कार्यालयात नायब तहसिलदारांची चार पदे मंजुर  आहेत.त्यापैकी दोन पदे भरलेली आहेत,तर दोन पदे रिक्त आहेत.नायब तहसीलदार ( महसूल -१) व नायब तहसीलदार (निवडणूक)ही दोन पदे भरलेली आहेत,तर नायब तहसीलदार (महसूल-२)व नायब तहसीलदार (पुरवठा)ही दोन पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत.

  तत्कालीन पुरवठा नायब तहसीलदार श्री.लोखंडे हे मागील काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेंव्हापासून पुरवठा विभाग हा अन्य नायब तहसीलदार यांना अधिकचा भार देऊन चालविल्या जात आहे.श्री.लोखंडे यांच्या सेवानिवृत्ती नंतर पुरवठा विभागाचा अधिकचा प्रभार महसुल नायब तहसीलदार -२ श्री.मेश्राम यांच्याकडे देण्यात आला होता.परंतु,अल्पावधीतच त्यांना पदोन्नती मिळाली व तहसीलदार म्हणून त्यांची इतरत्र बदली झाली.त्यांचा पदभार नंतर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महंमद रफिक यांना देण्यात आला होता. त्यांचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू असतांनाच अंतर्गत कुरबुरी मुळे तो पदभार काही महीन्यापुर्वी त्यांच्याकडून काढून घेऊन नायब तहसीलदार महसूल -१अनिता कोलगणे यांना देण्यात आला आहे. अर्थपूर्ण व्यवहारातून त्या छोट्या -छोट्या बाबिसाठी शिधापत्रिका धारकांना त्रास देत आहेत.

    किनवट तालुक्याचा विस्तार हा मोठा आहे.तालुक्यात १९१ गावे १४४ ग्राम पंचायती व २०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. अधिकचा भार असलेला नायब तहसीलदार हा पुरवठा विभागाला वेळ व न्याय देऊ शकत नाही,त्यामुळे किनवटच्या पुरवठा विभागात स्वतंत्र पुरवठा नायब तहसीलदार देऊन शिधापत्रिका धारकांना व रास्त भाव धान्य दुकानदारांना न्याय द्यावा,असे निवेदनात नमुद केले आहे.निवेदनावर किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे सचिव सुरेश शेंडे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत. 


No comments:

Post a Comment

Pages