नांदेड दि. 26 :- नांदेड येथे सर्व सोई-सुविधांसह विमानतळ असूनही केवळ विमानसेवा सुरू नसल्याने येथील विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर होते. नांदेड येथे येऊ इच्छिणाऱ्या शीख भाविकांसह इतर उद्योग व्यवसाय जगताशी निगडीत बहुसंख्य प्रवाशांची विमानसेवा नसल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर व्हावी व नांदेड जिल्हा देशातील प्रमुख महानगरांशी विमानसेवेने जोडला जावा यादृष्टिने महाराष्ट्र शासन उडान योजनेंतर्गत आग्रही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेऊन नांदेड जिल्ह्यासाठी आता अधिक भर घालून नवी भेट दिली आहे. फ्लाय 91, स्पाईस जेट व स्टार एअर या 3 विमानसेवा कंपन्यांनी सेवा देण्यास होकार कळविला आहे.
नांदेड येथून आता स्पाईस जेट ही कंपनी मुंबई, दिल्ली, अमृतसर, पटना या महानगरांसाठी विमान सेवा पुरवेल. फ्लाय 91 ही कंपनी नांदेड येथून बेंगलुरू, गोवा या महानगरांसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. स्टार एअर ही कंपनी नांदेड येथून पुणे, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद या ठिकाणी विमान सेवा देण्यासाठी तयार झाली आहे. देशातील प्रमुख महानगरांशी नांदेड आता विमानसेवेने जोडले जाणार असल्याने येथील उद्योग जगतासह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.
नांदेड विमानतळाच्या असुविधेबद्दल लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रश्न उपस्थित करून ही सुविधा सुरू व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यासाठी विशेष प्रयत्नरत होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागील महिन्यात यासाठी खास नांदेडला भेट देऊन विमानतळावरच आढावा बैठक घेतली होती. या बैठकीस खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भिमराव केराम व पदाधिकाऱ्यांसह नांदेड विमानतळ व्यवस्थापनाचे मुंबई येथील प्रमुख उपस्थित होते.
नांदेडसह मराठवाड्याला विकासाच्यादृष्टिने केंद्र शासनाने दिलेली ही अपूर्व भेट आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड भेटीचे हे फलित असल्याचे प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त दिली. मराठवाड्यासह जवळच्या 5 जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार असून दळणवळणाच्यादृष्टिने आता प्रगतीचे नवे दालन सुरू झाल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आभार मानले.
No comments:
Post a Comment