किनवट येथे पुलावरून पाणी वाहत असलेल्या पाण्यात एक व्यक्ती गेला वाहून ; इस्लापूर येथे तलाठी व गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 July 2023

किनवट येथे पुलावरून पाणी वाहत असलेल्या पाण्यात एक व्यक्ती गेला वाहून ; इस्लापूर येथे तलाठी व गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण

नांदेड  दि. 27 :- हवामान विभागाने व्यक्त केलेल्या भाकितानुसार आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने आपली संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात काल 26 जुलैच्या मध्यरात्री पासून पावसाने जोर पकडला. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील 1, भोकर तालुक्यातील 1, किनवट तालुक्यातील 5 अशा एकुण 7 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. किनवट येथे प्रशासनाने आवाहन करूनही बेल्लोरी नाला पूलावर वाहत्या पाण्यात पायी जाण्याच्या नादात अशोक पोशट्टी ही व्यक्ती वाहून गेली. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथील 25 वर्षे वयाचा प्रदिप साहेबराव बोयाळे हा युवक वाहून गेला. याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र होत असलेला पाऊस व यामुळे लहान-मोठे नदीनाले खळखळून वाहत आहेत. काही ठिकाणी पूर आलेला आहे. अशा स्थितीत नागरिकांना पाण्यात न उतरण्याचा, पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन त्यातून न चालविण्याचे, पाण्यातून न जाण्याचे आवाहन शासन वेळोवेळी करीत आहे. किनवट येथे बेल्लोरी नाल्यावर एका व्यक्तीने लोकांनी सांगूनही न ऐकता वाहत्या पुलातून पायी गेल्याने तो प्रवाहामुळे वाहून गेला. आपला जीव हा अधिक किंमती असून नागरिकांनी अशा स्थितीत संयमाने रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, आरोग्य विभाग, पोलीस विभाग हे परस्पर समन्वय ठेवून आहेत. यात कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

 

किनवट तालुक्यात इस्लापूर आणि शिवणी मंडळात रात्रीपासून संततधार पाऊस असल्याने इस्लापूर गावात पुराचे पाणी शिरले. मौजे दुधगाव, प्रधानसांगवी या गावांमध्ये काही घरे पाण्याखाली गेली. सुवर्णधरणाचे बॅकवाटर किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गावात असल्यामुळे पाणी गावात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा येथील प्रशासनाशी समन्वय साधून या धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकजाम ते शिवणी, अप्पारावपेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ, धानोरा  आदी रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली. इस्लापूर येथे साईबाबा मंदिराजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या नाल्याचे पाणी पुलावरून जात असतांना 55 वर्षाचे फर्दूके हे व्यक्ती पाण्यात अडकले होते. येथील तलाठी बालाजी वसमतकर यांनी सुरक्षिततेसह पाण्यात उतरून सदर व्यक्तीला धोक्याच्या पातळी बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता जेसीबीची मदत घेऊन या व्यक्तीला वाचिण्यात आले. मुदखेड तालुक्यात बोरगावसिता या गावातील 2 शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी झाडावर चढून आसरा घेतला. वैजापूर पार्डी येथे सितानदीच्या पुराच्या पाण्याने पवार कुटूंबियाच्या घराला वेडा घातला. प्रशासनाने दक्षता घेऊन वेळीच उपाय योजना केल्या. धर्माबाद तालुक्यातील पाटोदाथडी, माष्टी, मोकळी या गावांचा संपर्क पाण्याने तुटला होता. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे बन्नाळी गावातल्या एका परिवाराला पुरात वाहून जातांना जीवदान मिळाले. पोलीस निरीक्षक अशोक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पंतोजी, जमादार सोमनाथ मठपती आदी सर्वांनी मिळून पांचाळ कुटुंबीयांना बाहेर काढले.


धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथील अतीपावसामुळे ६० ते ७० कुटुंबाचे दोन बसेसद्वारे धर्माबाद येथील जिल्हा  

परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता पाण्यामुळे बंद पडला होता. 

माहूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू होता. सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी झालेला आहे. पुराच्या पाण्यामध्ये लोणी खु. अर्धापूर येथील माधव फुलाजी सोळंके मंदिरामध्ये अडकले. बचाव कामासाठी अग्‍नीशमन दलाची टीम पाठव‍िण्‍यात आली.

जिल्हा प्रशासनातर्फे सर्व यंत्रणेला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

बारड गावांमध्ये इंदिरानगर, शंकरनगर पांदन व भीमनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 10  कुटुंबातील 35  व्यक्तींना सुरक्षित जागी गावातील नातेवाईक यांचेकडे हलवण्यात आले. इतर कुटुंबासाठी जि. प. येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागेली गावामध्ये मातंग वाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 25  व्यक्तींना सुरक्षित जागी (समाज मंदिर) हलवण्यात आले आहे. 

जिल्हा प्रशासनाची सर्व टीम समन्वयाने गावोगावी लोकांसमवेत असून स्थानिक गावकरी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages