किनवट (प्रतिनिधी) : जुलै मध्ये मंगळवारी पडलेल्या पहिल्याच पावसात तालुक्यातील नऊ पैकी इस्लापूर व दहेली मंडळात जोरदार अतिवृष्टीची नोंद झालेली असून, यंदाची ही पहिली अतिवृष्टी आहे. शिवणी मंडळ वगळता इतर सहा मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. बुधवारी (दि.05 जुलै) सकाळी संपलेल्या गत 24 तासांत तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 438.3 मि.मी.असून, त्याची सरासरी 48.7 मि.मी.आहे.
तालुक्यात दरवर्षी जूनमध्ये मॉन्सूनचे धडाक्यात आगमन होत असते. यंदा मात्र पाऊस अक्षरश: रुसल्यामुळे जून तसा कोरडाच गेला. जून अखेर पडणाऱ्या पावसाची सरासरी 189.5 मि.मी.असते. परंतु, यंदा जूनअखेर फक्त सरासरी 50.50 मि.मी.पाऊस पडला. ऑक्टोबर अखेरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी केवळ 4.92 मि.मी.आहे. गतवर्षी जून अखेर सरासरी 157.80 पाऊस पडला होता. जूनमध्ये पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी 83.27 होती. यंदा आजपर्यंत सरासरी 100 मि.मी. पाऊस पूर्णत: झालेला नसूनही, तालुक्यातील खरीप पिकांची पेरणी 54 टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे. अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांनी जो काही थोडा फार पाऊस पडला होता, त्यावरच पेरणी आटोपून घेतली. त्या पिकांना कालच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या निकषानुसार गत 24 तासात 64.5 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यास, त्याची नोंद अतिवृष्टी म्हणून केली जाते. त्या अनुषंगाने इस्लापूर मंडळात 113.5 मि.मी. तर दहेली मंडळात 99.8 मि.मी. पाऊस झाल्याने, या दोन मंडळात यंदाच्या पहिल्या अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.
बुधवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 23.3(69.7 मि.मी.); बोधडी- 31.3(69.5मि.मी.); इस्लापूर- 113.5(173.0 मि.मी.); जलधरा- 42.0 (70.4 मि.मी.); शिवणी- 9.8(74.2 मि.मी.); मांडवी- 43.8(79.5 मि.मी.); दहेली- 99.8(165.8 मि.मी.), सिंदगी मो. 35.0 (113.9 मि.मी.); उमरी बाजार 39.8 (81.5 मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 897.5 मि.मी.असून, त्याची सरासरी 99.7 मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात बुधवार 05 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 237.4 मि.मी.असून, त्या तुलनेत केवळ 41.9 टक्के पाऊस पडलेला आहे. 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात केवळ 9.71 टक्के पाऊस पडलेला आहे. या पावसाने पेरणी वाया जाण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे
No comments:
Post a Comment