घाटकोपर मधील सरकारी हत्याकांड व विदर्भातील बौध्दांवर कहर ! - प्रा.राहुल मून - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 10 July 2023

घाटकोपर मधील सरकारी हत्याकांड व विदर्भातील बौध्दांवर कहर ! - प्रा.राहुल मून

             ११जुलै हा दिवस मुंबईतील घाटकोपर रमाई नगर येथील सरकारी हत्याकांडाचा २५ वा स्मृती दिन ! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबने वरुन संतप्त झालेले तेथील बौध्द मंडळी जमावाने रस्त्यावर आली असता,राज्य राखीव पोलीस दलाचा फौजदार नराधम मनोहर कदम याने आपल्या सरकारी स्वयंचलित बंदुकीतून जमावावर गोळ्यांचा वर्षाव करुन अकरा निपराधांची हत्या घडवून आणली होती.ही १९९७ सालची घटना आहे.यात शहीद झालेल्या भीम सैनिकास विनम्र अभिवादन ! 

          ज्या दिवशी ही घटना घडली.त्यावरुन संपूर्ण महाराष्ट्रातील बौध्दांत तीव्र आक्रोश निर्माण झाला होता.घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चा,धरणे, निदर्शने होवू लागले.सरकार शिवसेना- भाजपचे होते.या सरकारला शरद पवार यांच्या पक्षाचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यावेळी कारंजा घाडगे येथे मोर्चा काढण्यात आला होता.त्यात सहभागी होण्यासाठी परीसरातील खेड्यात-पाड्यातून आंबेडकरी बौध्द जनता मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.त्यात सात वर्षांच्या सुकेशिनी पासून तर अंशी वर्षाच्या वयातील म्हातारी मंडळी ही सहभागी झाली होती. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. त्या वेळी एक ७५ वर्ष वयाचा माणूस मरतो.तो आरोप पोलिस मोर्चात सहभागी लोकांवर ठेवतो.तो खुनाचा गंभीर आरोप असतो. सुमारे तीनशे लोकांना अटक करण्यात येते.पीडित कुटुंबातील सदस्य मदतीसाठी नागपूर, अमरावती येथील आंबेडकरी नेत्यांशी संपर्क साधतात.पण कोणीही त्यांना दाद देत नाहीत.हताश होवून त्यातील हेटीकुंडीचा युवक विजयी पाटील - बन्सोड इमामवाड्यातील नातेवाईक नरेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून व्यथा- वेदना मांडतो.तेथे त्यांना प्रा.राहूल मून,भैय्याजी खैरकर मिळतात.मग ते दैनिक जनवाद मध्ये उपसंपादक असलेल्या मिलिंद फुलझेले यांची भेट घेतात.फुलझेलेंना वाटते,रिपोर्टिंग करून मोकळे व्हायचे.त्या पलिकडे त्यांचा विचार नसतो.आणि हे दुसऱ्या दिवशी नरेश गायकवाड यांच्या तेव्हाच्या कमांडर वाहणाने कारंजा घाडगे अगोदर जवळच्या हेटीकुंडी गावात बन्सोड पाटलांच्या वाड्यावर पोहचतात.भरदुपारची वेळ असते.तेथे पीडित बौध्द बाया-माणसं अगोदरच हजर असतात.आम्ही पोहचताच त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा होता-होता त्यात पोलिसां सोबत तेथील जातीवाद्यचा जालीम अन्याय अत्याचार लक्षात येतो.पोलिसांनी कोणताही मुलाहिजा न दाखविता बाया-माणसांना काठ्यांनी बेदम ,बेरहम मारहाण केली होती.त्याच्या शरीरावरील खुणा आम्हाला सारेच जण दाखवित होते.ते ऐकून व बघून आमची मने विषाण्ण होवून सेना-भाजप सरकार व जातीवाद्यां विरुद्ध पेटून उठली होती.तेथून आम्ही तहसिलदार राजेंद्र कानफाडे यांना भेटायला कारंजा घाडगे कडे निघालो.त्यांचे सरकारी निवासस्थान हे शहरा बाहेर नागपूर रोड वर होते.ते आमच्या सर्वांचे परिचयाचे होते.नागपूर शहरातील राहणारे होते.त्यांनी सांगितले आता काही वेळानी पालकमंत्री अनिल देशमुख हे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सोबत सरकारी विश्रामगृहावर येणार आहेत.आपण त्यांना आपली कैफियत सांगा.

        आम्ही नागपूर हून आल्याची वार्ता तेव्हा पर्यंत वाऱ्या सारखी संपूर्ण कारंजा घाडगे परिसरात पोहचली होती.ते तयारीनिशी आमच्यावर हल्ला करण्यास तेथे पोहचले होते.पण आमचे वाहन सुसाट वेगात असल्याने त्यांची काही आमच्या वर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. पालकमंत्री देशमुख हा ही जातीवाद्याच्या कळपातील छुपा जीवजंतू निघाला.त्याला दोन शब्द हाणून आम्ही तेथून नागपूर कडे सायंकाळी निघते झालो.

          हेटीकुंडी मधील आपल्या बाया-माणसांच्या व्यथा वेदना ऐकून आम्ही सर्वच मनाने अस्वस्थ झाले होतो.रात्रभर सर्वांनाच झोप लागली नाही.दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व नरेश गायकवाड यांच्या घरी गोळा झालोत.तेथे एक प्रकारे आमची बैठकच झाली.तेथे माहिती मिळाली,सरकारी यंत्रणा व जातीवादी समिश्र अत्याचार हा कारंजा घाडगे शिवाय अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यातील खेड्यापाड्यात सुध्दा झाला आहे.गावात बौद्धांना एकटे पाडून बाकी सर्व हिंदू म्हणून एकत्र येतात.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी,भातुकली या तालुक्यातील बऱ्याच गावांना भेटी दिल्यात.जातीवाद्यांनी बौद्धांची घरेदारे उद्ध्वस्त केली होती.घरातील अन्नधान्य आणि स्वयंपाकाची भांडी देखील मोडून काढली होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे घराघरातील छायाचित्रेच नव्हे तर महात्मा फुले,गाडगे बाबा यांच्या छायाचित्रांनाही माळी,धोबी व इतरांनी पायदळी तुडविले होते.आणि रोजी-रोटीवर बंदी घातली होती.यवतमाळ जिल्ह्यातील दोघा ठोंबरे बंधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती.चंद्रपुरातील पोंभुर्णा बौध्द वाडा उद्ध्वस्त केला होता.या सर्वांना तातडीने अन्नधान्य व घालण्यासाठी कपड्यांची मदत पाहिजे होती.त्याच बरोबर जवळजवळ तीनशेच्या वर बौध्द माणसं- बाया कारागृहात डांबले गेले होते.त्यात सात वर्षांची सुकेशिनी ही सुद्धा खुनाच्या आरोपातून पोलिसांनी वगळली नव्हती.एकूण समाज व राजकीय व्यवस्थे बरोबर प्रशासकीय व्यवस्था ही बौध्दां विरुद्ध गेली होती.नागपूरला आम्ही काही आंबेडकरी नेते व ओबीसी विचारवंता कडे सहकार्यासाठी गेलोय होतो.ओबीसी विचारवंतांनी किनारा केला.पण जेव्हा पारधी समाज हा बौध्द होण्यास तयार झाला,तेव्हा नागपुरातील एक ओबीसी विचारवंत काळ्या मांजरी सारखा आडवा आला.तेव्हा त्यांचे व आमच्या समितीचे कार्यालय बैद्यनाथ चौकातील एकाच इमारतीत होते.

      या परिस्थितीशी लढण्याचा आम्ही निर्धार पक्का केला,या जुलुमा विरुद्ध एल्गार पुकारायच .आपल्या लोकांना मदत करायची.बस् झाले. आम्ही सर्व नागपूरच्या कार्यकर्ते यांनी बैठक घेऊन जे संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचार होत आहे या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली. अन्याय अत्याचार बौद्ध पुनर्वसन व संरक्षण समिती स्थापन केली. समितीने संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत विदर्भात ज्या ज्या ठिकाणी दलित,बौध्दांवर ॲट्रोसिटी झाल्या त्या गावात भेटी देऊन तेथील स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्या.येवढ्यात जापान मधील बुराकू समाजाचे प्रतिनिधी नागपूर भेटीवर आले होते.त्यांना आम्ही बौध्दावरील अत्याचाराचा हा सारा प्रकार दाखविला.ते अचंबित झाले होते.त्यांनी आम्हाला मदतीचे आश्वासन दिले.पण ती मदत कपडे सोडून मिळाली नाही.मधल्या दलालांचे हडप केली.आम्ही नागपूर शहरातून अन्नधान्य व कपडे गोळा केले.त्यात वर्धेतील विजय आगलावे आणि मित्र परिवाराने बरीच मदत केली.दोन मिनी ट्रक भरून धान्य गोळा करून अमरावती जिल्ह्यातील प्रभावीत गावातील बौद्धांना पोहचती केली.सततच्या अमरावती दौऱ्यात आमच्या आठ-दहा लोकांच्या जेवणाची सोय मिलिंद फुलझेले यांची मोठी बहीण उषा मुनेश्वर यांच्या कडे व्हायची.बाकी कुणा कडून ही आम्हाला दोन पैशाची मदत झाली नाही.

         अत्याचाराचा पाढा बराच मोठा होता.आणि संपूर्ण प्रस्थापित सामाजिक, राजकीय व्यवस्था बौध्दांविरुध्द होती.आम्ही विचार केला.हे सारं काही जगापुढे मांडले पाहिजे.यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दाऊद,न्या.सुरेश व न्या भाऊ वाहणे यांना फॅट्फाऊंड  कमिटी निर्माण केली. त्या मध्ये पत्रकार मिलिंद फुलझेले प्रा.राहुल मून, भैय्याजी खैरकर, छाया खोब्रागडे, नरेश गायकवाड प्रा डॉ प्रदीप आगलावे, विजय पाटील दयाराम गावंडे, प्रदीप मून, ॲड.सुरेश घाटे ॲड.जयदेव शामकुवर अनेक लोक होते. कमिटीने माजी न्यायमूर्ती दाऊद न्यायमूर्ती सुरेश न्यायमूर्ती भाऊ वाहणे यांच्या कमेटीने  गावा गावात भेटी देऊन किती लोकांनावर अन्याय झाला.याची इत्यंभूत माहिती गोळा केली. त्या वर एक पुस्तक प्रकाशित केले. तसेच सेना -भाजप सरकार वरुन " पेशवाईचा  काळानाम " असा एक टेब्युलेट साईज मध्ये २४ पानांचा खास विशेषांक काढला.व तो संपूर्ण महाराष्ट्र भर मोफत वाटला.  त्या विशेषांकाचे मुख्य संपादन मिलिंद फुलझेले होते. हे सर्व सरकारी दरबारी नोंद करून ठेवली आहे. आमच्या रमाबाई पाटील याची जातीयवादी लोकांनी नग्न धिंड काढण्यात आली ३०२चा केस मध्ये ७५ वर्षे असलेली व्यक्ती तर सात वर्षेची सुकेशनी अमरावती जेल मध्ये होते .अन्याय अत्याचार बौद्ध पुनर्वसन व संरक्षण समितीच्या वतिने सुमारे एक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात काम केले .तसेच पारधी समाजावरील अन्याय झाला त्याला सुद्धा वाचा फोडली. काठापूर, शिरखेड या गावात आमच्या टीम वर भ्याड हल्ला चढवला होता.त्यात आम्ही हिमतीने जीवंत बचावलो. हा वेगळा प्रलेख आहे.

                 -    प्रा.राहुल मून 

                       नागपूर

No comments:

Post a Comment

Pages