किनवट,दि.८ : गत मंगळवारी दोन मंडळात झालेल्या पहिल्या अतिवृष्टीनंतर परत गुरूवारी तालुक्यातील दहेली व उमरीबाजार मंडळात मुसळधार पाऊस पडून दुसऱ्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरीत सात मंडळात मात्र हलका स्वरुपाचा पाऊस पडला. शुक्रवारी (दि.७) सकाळी संपलेल्या गत २४ तासांत तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस २६९.४ मि.मी.असून, त्याची सरासरी २९.९ मि.मी.आहे.
आतापर्यंत तालुक्यातील नऊ मंडळापैकी दहेली मंडलात दोनदा तर इस्लापूर व उमरीबाजार मंडळात प्रत्येकी एकवेळा अतिवृष्टी झाली. किनवट व शिवणी मंडळ सोडून इतर सर्व मंडळामध्ये १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.यंदा तर अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांनी जो काही पाऊस पडला, त्यावरच पेरणीचा जुगार खेळला असून, आतापर्यंत तालुक्यात ८३.६९ टक्के खरीप पिकांची पेरणी झालेली आहे. कालच्या पावसाने या कोवळ्या पिकांना जीवदान लाभले आहे.
शुक्रवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- १०.०(८५.७ मि.मी.); बोधडी- २८.५(१०६.३ मि.मी.); इस्लापूर- ०८.५(२२२.३ मि.मी.); जलधरा- ११.३ (१२०.५ मि.मी.); शिवणी- १९.५(९६.७ मि.मी.); मांडवी- २७.८(१०९.६ मि.मी.); दहेली- ८९.३(२५७.६ मि.मी.), सिंदगी मो. ०९.५ (१२६.५ मि.मी.); उमरी बाजार ६५.० (१४९.३ मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस १,२७४.२ मि.मी.असून, त्याची सरासरी १४१.५८ मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस दहेली मंडळात झाला असून, सर्वात कमी किनवट मंडळात झालेला आहे. तालुक्यात शुक्रवार(ता.७) पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस २५६.६ मि.मी.असून, त्या तुलनेत केवळ ५२.२ टक्के पाऊस पडलेला आहे.
१ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस १०२६.५८ मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात केवळ १३.७६ टक्के पाऊस पडलेला आहे. आतापर्यंत केवळ तीनच मंडळात जोरदार पाऊस झाला असून, उर्वरीत मंडळातील शेतकऱ्यांना अजूनही मोठया पावसाची प्रतिक्षा आहे. नदी,नाले थोडेफार वाहते झाले असून, विंधनविहिरींतील पाण्याची पातळी मात्र अजून वाढलेली नाही.
No comments:
Post a Comment