किनवट तालुक्यात खरीप पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद 93 हजार 326 अर्जदार ; विमा संरक्षित रक्कम 3 अब्ज 11 कोटी 34 लाख रुपये - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 August 2023

किनवट तालुक्यात खरीप पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद 93 हजार 326 अर्जदार ; विमा संरक्षित रक्कम 3 अब्ज 11 कोटी 34 लाख रुपये

किनवट,दि.25 (प्रतिनिधी) : खरीप हंगाम 2023-24 मध्ये पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत यंदा किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी प्रतिसाद दिला असून, तब्बल 39 हजार 548 अर्जदार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद व खरीप ज्वारी या पिकांसाठी केवळ एक रुपया भरून 93 हजार 326 अर्ज दाखल करून पीक विमा योजनेत भाग घेतला आहे. यात 58 हजार 846.31 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालेले आहे. विमा कंपनीकडे शेतकऱ्यांसह राज्य व केंद्र शासनाचा 42 कोटी 88 लाख 12 हजार 105.89 रुपयांचा विमा हप्ता जमा होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


      पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023-24 करिता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. सुरुवातील 01 जुलै ते 31 जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत होती. यानंतर तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत सोयाबीन,कपाशी,तूर,मूग,ज्वारी,उडीद या सहा पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला. विमा कंपनीकडे 93 हजार 326 शेतकऱ्यांचा प्रति अर्ज एक रुपया, राज्य शासनाचे 26 कोटी 47 लाख 63 हजार 794.6 आणि केंद्र शासनाचे 16 कोटी 39 लाख 54 हजार 986.4 रुपये असा एकूण 42 कोटी 88 लाख 12 हजार 107 रुपयांचा विमा हप्ता जमा होणार आहे. यातून 03 अब्ज 11 कोटी 34 लाख 03 हजार 041 रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकूण 93 हजार 326 शेतकऱ्यांमध्ये पुरुष 70 हजार 285, महिला 23 हजार 020 तर इतरांमध्ये 21 व्यक्ती आहेत.


      तालुक्यातील नऊ महसूल मंडळातील पीकविम्याचा तपशील पाहता बोधडी सर्कलमधून 19 हजार 964 शेतकऱ्यांचे अर्ज , दहेली सर्कलमधून 08 हजार 513 अर्ज, इस्लापूर सर्कलमधून 15 हजार 215 अर्ज, जलधारा सर्कलमधून 10 हजार 337 अर्ज, किनवट सर्कलमधून 08 हजार 632 अर्ज, मांडवी सर्कलमधून 07 हजार 184 अर्ज, शिवणी सर्कलमधून 12 हजार 023 अर्ज, सिंदगी मोहपूर सर्कलमधून 09 हजार 483 अर्ज तर उमरी बाजार सर्कलमधून 08 हजार 975 अर्ज मिळून एकूण 93 हजार 326 असे विक्रमी अर्ज भरून खरीप पीकविमा काढण्यात आला. या एकूण अर्जातील शेतकऱ्यांमध्ये 58 शेतकरी हे कर्जदार असून, 93 हजार 268 शेतकरी हे बिगर कर्जदार आहे.


      दरम्यान, केवळ एक रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे नांदेड जिल्ह्यात आजपर्यंतच्या काळात यंदा सर्वात अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात 10 लाख 67 हजार 804 अर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता तर किनवट तालुक्यात 49 हजार 258 शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले होते. त्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांच्या हिताच्या  या अनोख्या पीकविमा योजनेमुळे अतिशय उत्तम असा ‘रेकार्डब्रेक’ प्रतिसाद मिळाला आहे.


 


“नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगामातील ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस या पिकांसाठी सदर पीकविमा योजना राबविण्यात आली होती. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची होती. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान यासाठी पात्र आहे. तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान या पीकविम्यासाठी पात्र आहे.”


- बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages