किनवट (प्रतिनिधी) : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय व केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र दिल्ली येथे आयोजित भारतातील सर्वात मोठी ‘जिज्ञासा’ आझादी का अमृत महोत्सव प्रश्नमंजुषा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील किनवट तालुक्यातील कोल्हारी या आदिवासी भागातील ऋतुजा पंडित अन्नमवाड या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले आहे.
संपूर्ण भारतातून या परीक्षेसाठी 28 राज्यांमधील जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर 40 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेऊन अंतिम फेरीसाठी त्यातील 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग प्रवर्गातून दोन विद्यार्थ्यांची संपूर्ण भारतातून निवड करण्यात आली. त्यामध्ये ऋतुजा या विद्यार्थिनीने सर्व टप्पे पार करीत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली.
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्य पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री रामेश्वर तेली दिल्ली, तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे चेअरमन श्रीकांत वैद्य यांच्या हस्ते ऋतुजाला 12 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र, विजयचिन्ह व एक लाख 25 हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला.
अत्यंत बिकट परिस्थितीत डीएमएलटी चे शिक्षण घेत तिने या स्पर्धेसाठी नोंदणी केली व सर्व पातळ्यावरील टप्पे पार करत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. परीक्षेच्या तयारीसाठी तिला जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कैलास नकुले व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल ऋतुजाचे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment