विवेकवाद हे मूल्य अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग - शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी ; नांदेड येथे अंनिसच्या राज्यकार्यकारणी बैठकीत विविध पुरस्कारांचे वितरण संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 October 2023

विवेकवाद हे मूल्य अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग - शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी ; नांदेड येथे अंनिसच्या राज्यकार्यकारणी बैठकीत विविध पुरस्कारांचे वितरण संपन्न

नांदेड :

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नांदेड येथे शुभारंभ मंगल कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीसाठी राज्यातील 23 जिल्ह्यातून दीडशेहून अधिक अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


काल रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी बैठकीचा समारोप झाला. समारोपप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जाहीर झालेले विविध राज्य पुरस्कारांचे वितरण केले गेले. 


अंनिसचा राज्यस्तरीय सुधाकर आठले युवा पुरस्कार विनायक माळी मंगळवेढा, जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार श्रीपाल ललवाणी पुणे, सावित्रीमाई फुले प्रेरणा पुरस्कार उषा शहा सोलापूर, भटक्या विमुक्तांच्या कार्यासाठी दिला जाणारा प्रबोधन पुरस्कार मतीन भोसले अमरावती, सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार हेरंब कुलकर्णी अकोले तसेच अंनिस कार्यकर्ता जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी बेळगाव यांना ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मंचावर सम्राट हटकर, मिलिंद देशमुख राहुल थोरात तसेच जेष्ठ कॉ. व्यंकटराव करखेलीकर यांची विशेष उपस्थिती होती.


जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी म्हणाले की,विवेकवाद व मानवतावाद यांना केंद्रबिंदू समजून आपल्या अंनिसची वाढ होत आहे, मानवतावादाची वाट ही नेहमीच अंधश्रद्धांची जळमटं दूर करून व्यक्ती व समाज यांना विवेकवादाकडे नेणारी आहे. यातूनच आपल्या समाजाला मानवतावादी बनवायचे आहे. 


शास्त्रज्ञ नानावटी पुढे म्हणाले की, विवेकवाद हे मूल्य अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. इतर राज्यांच्या तुलनेने आपल्या महाराष्ट्राने विवेकवादाचा विचार थोड्या फार प्रमाणात स्वीकारला आहे, हे आपल्याला नक्कीच जाणवत असेल. गेल्या ३०-३५ वर्षात डॉ. दाभोलकर विचारांना समाजमान्यता मिळत गेली हेही आपण नाकारू शकत नाही. 

आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना हा एक वसा म्हणून कार्य करायचे आहे. आपण हे कार्य करत आहात याचा माझ्यासारख्यांना नक्कीच अभिमान आहे.


गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार प्राप्त हेरंब कुलकर्णी पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले की, या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या कार्याचा संबंध आगरकरांशी जोडला गेला हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आगरकरांच्या काळात समाज प्रबोधनाचे काम सोपे होते असे वाटते, कारण त्यांना विरोध करणाऱ्यांच्या मनामध्ये थोडी तरी सहिष्णुता होती. पण आज ती संपूर्ण संपत चालली आहे असे वाटते. डॉ.दाभोलकर, पानसरे कलबुर्गी, लंकेश यांचे खून म्हणजे आमच्या हृदयावर पाडलेल्या जखमा आहेत. 


हेरंब कुलकर्णी पुढे म्हणाले की,

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी मला पहिल्यांदा लिखाणासाठी प्रोत्साहित केले. वंचिताचे शिक्षण हा साधनेचा विशेषांक मला संपादित करायला लावला आणि त्याच्या 70 हजार प्रति महाराष्ट्रातील शाळांच्या मध्ये वितरित केल्या गेल्या. हा माझा मोठा बहुमान दाभोलकरांनी केला.


भटक्या समाजातील फासेपारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रश्नचिन्ह नावाची शाळा सुरू करणारे मतीन भोसले पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले की, भारतात आजही भटका समाज पारतंत्र्यातच आहे, शिक्षण आरोग्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात नाही. आज प्रश्नचिन्ह शाळेत 500 पेक्षा जास्त भटक्या समाजातील मुलं मुली शिक्षण घेत आहेत. या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या सर्वांची मदतीची गरज आहे. भटक्या समाजातील चुकीच्या रूढी परंपरा अंधश्रद्धा दूर करण्याचे मोठे आव्हान आपल्याला पार पाडायचे आहे. यावेळी 'प्रश्नचिन्ह' या शाळेसाठी उपस्थित अंनिस कार्यकर्त्यांनी रुपये एक लाखाची देणगी संकलित करून दिली.


या कार्यक्रमात अंनिसच्या कार्यासाठी नेहमी सहकार्य करणारे नांदेड येथील हितचिंतक प्राचार्य डॉ. विजय पवार, डॉ. दि. भा. जोशी, प्राचार्य डॉक्टर के. हरिबाबू, प्रा. डॉ. लेनिना, डॉ. रवींद्र नरोड, प्रा. सुलोचना मुखेडकर, प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, उषा गैनवाड यांचाही सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला गेला.


सूत्रसंचालन फारूक गवंडी यांनी केले तर आभार प्रशांत पोतदार यांनी मांडले. कार्यक्रमाचे संयोजन नांदेड अंनिसचे  कार्यकर्ते कमलाकर जमदाडे, भगवान चंद्रे, इंजि. शंकरराव खरात, नितीन ऐंगडे, रवी देशमाने, डॉ. सारिका कांबळे-शिंदे, प्रतिभा कोकरे, चित्ततोष करेवार, कपिल वाठोरे, प्रा. डॉ. संग्राम पंडित प्रा. डॉ. शिवाजी कांबळे, इंजि. विजया मुखेडकर इंजि. रंजना खटके यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages