किनवट,दि.04(प्रतिनिधी) : सततचा पाऊस व दहा वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील सप्टेंबरअखेर नजर अंदाज पैसेवारी सरासरी 53 जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळे सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. ऑक्टोबर अखेर महसूल प्रशासनाकडून तालुक्याची सुधारित पैसेवारी सरासरी 47.6 जाहीर झाल्यामुळे, शेकडो बाधित शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
किनवट तालुक्यातील एकूण 191 गावातील पीक लागवडीयोग्य क्षेत्र 81,060.43 हेक्टर असून, यंदाचे खरीपातील पेरणी केलेले क्षेत्र 78 हजार 781 हेक्टर आहे. पावसाळ्यात तालुक्यातील विविध मंडळात तब्बल दहा वेळा झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील एकूण 58 हजार 905 शेतकऱ्यांच्या उपरोक्त क्षेत्रातील 65 हजार हेक्टर जिरायत, बागायत व फळपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले होते. परिणामी, बाधित शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. अशात खरीप हंगामाच्या उत्पादनाचे प्राथमिक चित्र स्पष्ट करणारी किनवट तालुक्यातील पैसेवारी लागू असलेल्या 176 महसूली गावांमधील नजरअंदाज पैसेवारी 30 सप्टेंबर रोजी 53 पैसे दाखविण्यात आली होती. 50 पैशाच्या आत जर अंतिम पैसेवारी आली तरच परिस्थितीनुसार ओला किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करून शासन मदत करीत असते. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसुलात सूट, शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे. नजरअंदाज पैसेवारीत तालुक्यातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र, महिनाभरानंतर तालुक्यातील नऊ मंडळातील निवडक सज्जांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात हलक्या, मध्यम व भारी जमीनीच्या शेतात प्रत्येकी तीन पीक कापणी प्रयोग करून ही सुधारित पैसेवारी गाव पैसेवारी समितीच्या सहकार्याने काढण्यात आली आहे, असे महसूल सूत्रांकडून समजले.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नऊ महसूली मंडळात निघालेली सुधारित पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असून ती पुढील प्रमाणे आहे. इस्लापूर : 49 पैसे, जलधरा : 49 पैसे, शिवणी :47.4 पैसे, बोधडी बु.: 47 पैसे, किनवट 47.3 पैसे, मांडवी :48 पैसे, दहेली:47 पैसे, उमरीबाजार : 47 पैसे आणि सिंदगी मोहपूर : 47 पैसे अशी सुधारित पैसेवारी काढण्यात आली आहे. या नऊ मंडळांची सरासरी केल्यानंतर किनवट तालुक्याची सुधारित पैसेवारी 47.6 घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. 31 डिसेंबरला अंतीम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच खरीपाच्या तालुक्यातील एकंदर स्थितीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी या सुधारीत पैसेवारीत ओल्या दुष्काळाचे किंचीत दर्शन झाले असल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये शासकीय मदतीची आशा निर्माण झालेली आहे.
“सप्टेंबरमध्ये 50 पैशापेक्षा जास्त जाहीर पैसेवारी नजरअंदाज असल्यामुळे, यात नेहमीच सुधारणेला वाव असतो. गत महिन्यात झालेल्या पीक कापणी प्रयोगामध्ये पिकांच्या उत्पादकतेची वस्तुस्थिती समोर आल्यामुळे, आपसूकच सुधारित पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी अर्थात 47.6 आलेली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर होण्याऱ्या अंतिम पैसेवारीत चित्र अजून स्पष्ट होईल.”
- डॉ.मृणाल जाधव. तहसीलदार, किनवट
No comments:
Post a Comment