त्या 38 बालकांचा श्रवणयंत्रणामुळे ऐकु येण्यासह द्विगुणित झाला आत्मविश्वास राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत श्रवण यंत्राचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 20 December 2023

त्या 38 बालकांचा श्रवणयंत्रणामुळे ऐकु येण्यासह द्विगुणित झाला आत्मविश्वास राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत श्रवण यंत्राचे वाटप

नांदेड  दि. 20 :- बालवयातच असलेल्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे व त्यावर तात्काळ उपचार करून बालकांचे आरोग्य निरोगी व्हावे, त्यांच्यात असलेले व्यंग दूर व्हावे, आजार दूर व्हावेत या उद्देशाने शासनातर्फे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. नांदेड जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक बालकांना याचा लाभ व्हावा असे निर्देश जिल्हाधिकरी अभिजीत राऊत यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 87 हजार 83 बालकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येऊन यातील विविध गंभीर आजार आढळलेल्या मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. या तपासणीत तब्बल 65 मुलांमध्ये कर्णदोष आढळला. त्यांची तपासणी केल्यानंतर 38 बालकांचे कर्णदोष कानातील मशीनच्या सहाय्याने कमी होण्यासाठी त्यांना आज श्रवणयंत्र बहाल करण्यात आले.  

 

नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात आज हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते हे श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी मोहिम आयोजित करण्यात आली होती. यात एकुण 4 हजार 92 अंगणवाड्यांपैकी जिल्ह्यातील 3 हजार 345 अंगणवाड्यांच्या माध्यमातून वय वर्षे 0 ते 6 वर्षे या वयोगटातील सुमारे 2 लाख 87 हजार 83 बालकांची तपासणी करण्यात आली. यात कर्णदोषाचे सुमारे 65 बालके समोर आली. त्यांच्यासाठी पुन्हा 9 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी वेगळी तपासणी करण्यात आली. यात 38 बालके पात्र झाली. या बालकांना आता ही श्रवणयंत्रे मिळाल्यामुळे त्यांना ऐकू येण्यासह आत्मविश्वासही द्विगुणित झाला.

 

कोणत्याही बालकाला एखादा आजार असेल तर त्याला तात्काळ वैद्यकिय सुविधा व उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविल्या जाते. नांदेड जिल्ह्यातील 61 मुले ही हृदयरोगाशी संबंधित आढळून आली होती. या मुलांवर एप्रिल ते आजपर्यंत हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. याचबरोबर इतर आजाराच्या 186 बालकांवर वेगवेगळ्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी तीन बालके कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी पात्र झाली असून त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्याच्यादृष्टिने कुटुंबासमवेत समुपदेशन केले जात आहे.  


No comments:

Post a Comment

Pages